* खालापूर येथे आदिवासी संवाद मेळावा संपन्न
* कातकरी समाजासह आदिवासी कुटुंबांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध
रायगड / प्रतिनिधी :- केंद्र सरकारची पीएम जनमन योजना आणि राज्यातील आभा योजना या दोन्ही योजनांद्वारे कातकरी समाजासह सर्व आदिवासी कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प आहे. त्यासाठी १३ विभागांच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉं. अशोक वुईके यांनी खालापूर येथे दिले.
खालापूर येथे आयोजित आदिवासी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात मतदारसंघातील आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री डॉं. वुईके म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएम जनमन’ सारख्या धोरणात्मक योजनांच्या माध्यमातून कातकरी व इतर आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. राज्य सरकारने सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘आभा’ योजना जाहीर केली असून, तिचा १०० दिवसांचा कृती आराखडा आखण्यात आला आहे. याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहॆ. शासन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमापूर्वी मंत्री महोदयांनी तीन तालुक्यांतील स्थानिक आदिवासी समाजाशी संवाद साधून योजनांची अंमलबजावणी कशी होते आहे याचा आढावा घेतला. त्यांनी समाधान व्यक्त करीत सांगितले की, ही वाटचाल निश्चितच आदिवासी समाजाला समृद्धीकडे घेऊन जाणारी आहे. या संवाद मेळाव्यात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments