खालापूर / सुधीर देशमुख :- थेट निधी ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगमताने ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार वाढल्याच्या बातम्या ऐकिवात आहेत. यावर प्रतिबंध करण्यासाठी शासन निर्णय परिपत्रक व आदेश पारित करण्यात आला आहे. सरपंचाने भ्रष्टाचार केल्यास त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
राज्य शासनाचे आदेश. परिपत्रक व्हीपीएम/२०१६ /प्र क्र २५३/परा-३ या नुसार गाव कारभार चालवितांना ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे, मालमत्ता अथवा निधीचा अपहार करणे, ग्रामपंचायतीतील मूळ दस्तऐवजामध्ये खोट्या, बनावट कागदपत्रांचा समावेश करणे, असे प्रकार करणाऱ्या सरपंचांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. भ्रष्ट सरपंचाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीला दिला आहे, त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
गावोगावी ग्रामपंचायतीद्वारे शासकीय योजना राबवत असताना भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आले आहेत, असे प्रकार गंभीर स्वरूपाचे असल्याने शासनाने आता फौजदारी कारवाई बरोबरच अपहार केलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्यात जबाबदार असणाऱ्या संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी यापैकी कोणीही अथवा सर्वजण चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेशात नमूद केले आहेत. ग्रामपंचायत हा लोकशाहीचा कमी आणि भ्रष्टाचाराचा पाया जास्त असेच विदारक चित्र पाहायला मिळत आहे. सरपंच आणि ग्रामसेवक या कर्तव्यदक्ष अधिकारी - पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने अनेक गावांची वाट लागल्याच्या तक्रारी शासन दरबारी दाखल झाल्या आहेत. विरोधकांनी त्यांचे कितीही भ्रष्टाचार बाहेर काढले असले, तरीही कारवाई होत नसल्याने अशा महाठगांचे फावले आहे. आता त्याला ब्रेक लावणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य शासनाचा विविध प्रकारचा निधी आता थेट ग्रामपंचायतींना येत आहे. यात प्रामुख्याने वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीला सर्वाधिक मिळत आहे. निधीचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी ग्रामविकास खात्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले आहेत. अपहाराच्या रकमेत विभागीय चौकशींमध्ये गुन्हा घडल्याबाबत निष्कर्ष काढण्यात आल्यास संबंधिताविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच ज्या प्रकरणांमध्ये कोणतीही चौकशी झालेली नाही, अशा प्रकरणी संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्राथमिक चौकशी करावी, चौकशी एका महिन्यांमध्ये पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.
* ग्रामसेवकांवर राहणार वॉच :- एखाद्या ग्रामसेवकाने नोकरी लागल्यापासून नोकरीच्या दहा वर्षांनंतर भ्रष्टाचार केला असेल तर त्याच्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनचा तपास करण्याबाबतचा निर्णयदेखील ग्रामविकास मंत्रालयाने घेतला असल्याने प्रशासनातील सर्वच अधिकार्यांचे धाबे दणाणले आहे. यामध्ये दस्तऐवजामध्ये हेराफेरी करणे, चुकीचे कागदपत्रे जोडणे, बनावट बिलाची नोंद घेणे आणि खर्च न करता बिले कॅशबुकला जोडणे हे प्रकार आता फौजदारी कक्षात येत असून, अशा भानगडी करणार्या सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यापैकी कोणीही दोषी आढळला किंवा ही हेरीफेरी केल्यानंतर जर त्याला बीडीओ पाठीशी घालत असेल तर, अशा सर्व व्यक्तींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासंदर्भाचे आदेश देण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments