* आता बस झाले आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका
नाशिक / प्रतिनिधी :- त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे काही वरिष्ठ पत्रकारांवर झालेल्या भयंकर हल्ल्याने पत्रकार समाज संतप्त झाला आहे. झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळ गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक, मारहाण आणि अपमानास्पद वागणूक केली. या हल्ल्यात किरण ताज गंभीर जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेचा तीव्र निषेध व्हॉईस ऑफ मीडिया व व्हिओएम (V.O.M.) इंटरनॅशनल फोरमतर्फे केला गेला आहे. संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दीर्घ पत्र पाठवून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संदीप काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, आता बस झाले आहे. दोषींवर तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर पत्रकार समाज आणि जनतेचा रोष राज्यभर प्रकट होईल. आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका.
पत्रकार हे लोकशाहीचे चौथास्तंभ आहेत. सत्य मांडणे, जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि समाजातील अन्याय व भ्रष्टाचार उघड करणे हे त्यांच्या कर्तव्यात समाविष्ट आहे. अशा कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले केवळ पत्रकारांवर नाही तर संपूर्ण लोकशाहीवर घाला घालणारे आहेत.
* संदीप काळे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविलेल्या पत्रात केलेल्या मागण्या :-
१) या घटनेतील सर्व दोषींना तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी.
२) राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा यंत्रणा उभारावी.
३) भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी ठोस, प्रभावी व दीर्घकालीन धोरण जाहीर करावे.
४) प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार संरक्षणासाठी विशेष सेल स्थापन करून तत्काळ मदत व तपास प्रक्रिया सुरु करावी.
संदीप काळे यांच्या पत्रात सांगितले आहे की, आज महाराष्ट्रातील पत्रकार संतप्त आहेत, पण या घटनेमुळे लोकशाहीच्या विश्वासाला मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जर दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर पत्रकार समाजासह नागरिकांचा रोष राज्यभर दिसेल. आपण त्वरित निर्णय घेतला, तर पत्रकारांना पुन्हा निर्भयतेने काम करण्याचा आत्मविश्वास मिळेल. अन्यथा लोकशाही व जनतेच्या विश्वासावर गंभीर परिणाम होईल.

Post a Comment
0 Comments