Type Here to Get Search Results !

उपेक्षित घटकांना अन्न व उब देणे ही खरी मानवसेवा

* वैशालीताई मोहोड : मानव सेवा फाऊंडेशनतर्फे अन्नदान संपन्न

अकोला / प्रतिनिधी :- मानव सेवा फाऊंडेशन, अकोला या सामाजिक व सार्वजनिक मंडळाकडून “घास घासाला मिळावा” या उदात्त हेतूने गेल्या नोव्हेंबर 2018 पासून सतत अन्नदान उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी सकाळी जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच खरोखरच अन्नाची गरज असणाऱ्या गोरगरिबांना भोजनदान केले जाते.


शनिवार, 20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता झालेल्या या अन्नदान उपक्रमाचे अन्नदाते वैशालीताई अभयराव मोहोड व इंजिनिअर अभयराव रतनकुमार मोहोड (विद्युत विभाग, पारस) हे होते. त्यांच्या सहकार्याने आयोजित या अन्नदान कार्यक्रमात अनेक गरजू लाभार्थ्यांना भोजन देण्यात आले.


याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केलविन सुबी कमलजीत कौर, राजेश धनगावकर, विवेक सातपुते सर, सीतारामजी मुंदडा, भाला जी, प्रा. रवी अण्णा देशमुख सर, राहुल खंडाळकर, पूनमताई रा. खंडाळकर, सिद्धार्थ इंगळे तसेच इतर मान्यवर व फाऊंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान वैशालीताई मोहोड यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक करीत, समाजातील उपेक्षित घटकांना अन्न व उब देणे ही खरी मानवसेवा असून यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार हातभार लावावा, असे प्रतिपादन केले.


यावेळी विवेक सातपुते सरांनी उपस्थितांचे आभार मानले. मानव सेवा फाऊंडेशनतर्फे अन्नदानासोबत दरवर्षी हिवाळ्यात उघड्यावर झोपलेल्या उपेक्षित व वंचितांना ब्लँकेट वाटप तसेच दीपावलीच्या काळात रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना गोडधोड फराळाचे वाटप असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. या सर्व कार्यामध्ये समाजातील दानशूर व्यक्तींचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असल्याने संस्थेची कार्ययात्रा अधिक व्यापक स्वरूप धारण करीत आहे.



Post a Comment

0 Comments