* 'रायगडची झुंज’चे संपादक पत्रकार नरेश जाधव यांचे प्रशासनाला निवेदन
कर्जत / प्रतिनिधी :- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरात सुरू असलेल्या अवैध फटाके विक्रीविरोधात प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ‘रायगडची झुंज’चे संपादक आणि पत्रकार नरेश शिवाजी जाधव यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलीस अधीक्षक, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत पोलीस निरीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी व प्रदूषण नियंत्रण विभाग (नवी मुंबई) यांना सविस्तर लेखी निवेदन दिले आहे.
* सुरक्षेचा प्रश्न गंभीर, प्रशासन जागे व्हावे -पत्रकार जाधव :- पत्रकार नरेश जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे की, दिवाळी सणाच्या काळात कर्जत शहरात अनेक ठिकाणी परवान्याशिवाय फटाके विक्री केली जाते. काही व्यापारी बाजारपेठ, रस्त्यांच्या कडेला किंवा नगर परिषदेच्या गटारावर मंडप टाकून दुकाने उघडतात. ही दुकाने ना अग्निशमन नियमांचे पालन करतात, ना सुरक्षा नियमांचे. अशा ठिकाणी जर आग लागली, तर ती भयंकर दुर्घटनेत रूपांतरित होऊ शकते. त्यांनी याकडे लक्ष वेधले की, दरवर्षी अशा घटना दिसून येत असूनही प्रशासन व पोलिस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे गैरप्रकारांना चालना मिळत असून सार्वजनिक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
* निवेदनातील महत्त्वाच्या मागण्या :-
- फक्त परवानाधारक व्यापाऱ्यांनाच फटाके विक्रीची परवानगी द्यावी.
- गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठेत, मुख्य रस्त्यांवर आणि गटारावर फटाक्यांची दुकाने लावण्यास बंदी घालण्यात यावी.
- शासनाने बंदी घातलेले धोकादायक फटाके विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी.
- रात्री १० नंतर फटाक्यांची विक्री बंद ठेवावी आणि या नियमाचे काटेकोर पालन करावे.
- फटाके विक्री परवान्यांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास परवाने रद्द करावेत.
- एका परवान्यावर एकच दुकान चालविण्याची अट सक्तीने लागू करावी.
- मर्यादेपेक्षा जास्त फटाक्यांचा साठा आढळल्यास गुन्हा नोंदवावा.
- आवाज मर्यादा पाळणारे फटाकेच विक्रीस परवानगी द्यावी.
- सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
* फटाक्यांच्या आगीचे भीषण परिणाम संभवतात :- निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जर भर बाजारपेठेत किंवा गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांच्या दुकानांना आग लागली, तर जीवितहानीची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस आणि नगर परिषद प्रशासनाने आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करून दुकाने तपासावीत. अशा प्रकारच्या घटनांमुळे फक्त जीवितहानीच नव्हे, तर प्रदूषण आणि ध्वनी मर्यादा ओलांडल्या जातात, याकडेही पत्रकार नरेश जाधव यांनी लक्ष वेधले आहे.
* संयुक्त तपासणी मोहीमेची मागणी :- पत्रकार जाधव यांनी पुढे सांगितले की, अवैध फटाक्यांची विक्री व साठेबाजीमुळे केवळ आग धोकाच नाही, तर वायू आणि ध्वनी प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्त तपासणी मोहीम राबवावी आणि उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी.
* प्रशासनास आंदोलनाचा इशारा :- पत्रकार जाधव यांनी इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने या निवेदनाची तात्काळ दखल घेतली नाही, तर ‘रायगडची झुंज’ व स्थानिक नागरिकांच्या वतीने कर्जत नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, आणि त्याची सर्व जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
कर्जत शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. पत्रकार नरेश जाधव यांच्या या निवेदनाने प्रशासनाच्या निष्क्रियतेकडे बोट दाखवले असून, “फक्त परवानाधारक विक्रेत्यांनाच विक्रीची परवानगी द्यावी आणि अवैध फटाक्यांना आळा घालावा” हीच नागरिकांची मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Post a Comment
0 Comments