Type Here to Get Search Results !

हाळ खुर्द ग्रामपंचायतीत पाण्याचा तुटवडा !

* नागरिक त्रस्त : पत्रकार खलील सुर्वे यांचे गटविकास अधिकाऱ्याकडे निवेदन

* कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा, ग्रामस्थांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचा आरोप

खालापूर / प्रतिनिधी :- हाळ खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील खालची अळी परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सा. खालापूर वादळचे संपादक, पत्रकार खलील सुर्वे यांनी गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि ग्रामसेवक यांना लेखी निवेदन सादर केले आहे.


पत्रकार खलील सुर्वे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, हाळ खुर्द गावातील घर क्रमांक ५१८ व आजूबाजूचा परिसर गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याने त्रस्त आहे. दररोज पाणीपुरवठा फक्त अर्धा तास चालतो, आणि त्यात १५ ते २० लिटर पाणी मिळणेही कठीण होते. या परिस्थितीत गावातील अनेक कुटुंबांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भर पावसाळ्यातही नागरिकांना पाणी मिळत नाही, ही प्रशासनासाठी “लाजिरवाणी बाब” असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तोंडी तक्रारी करण्यात आल्या असून, प्रत्येक वेळी कर्मचारी “मामाने पाणी सोडले नाही” अशा स्वरूपाचे उत्तर देतात. सदर ‘मामा’ नामक व्यक्तीचे वय अंदाजे ७० वर्ष असून, त्यांच्याकडेच पाणीपुरवठ्याचे काम असल्याने योग्य नियोजन आणि व्यवस्थापन होत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.


ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, गावातील लोकप्रतिनिधी स्वतःच्या वैयक्तिक कामात व्यस्त असल्याने सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे ते दुर्लक्ष करत आहेत. ज्यांचा सत्ताधाऱ्यांशी संपर्क आहे, त्यांनाच नियमित पाणी मिळते. बाकीचे नागरिक उपेक्षित आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, आम्ही या गावाचेच रहिवासी नाही का ? आम्ही कर भरत नाही का ? मग आम्हाला पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधा का मिळत नाहीत ?


पत्रकार खलील सुर्वे यांनी आपल्या निवेदनात प्रशासनाकडे हाळ खुर्द ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा नियमित करावा व दाब वाढवावा, सर्व नळांना समप्रमाणात पाणी मिळावे, यासाठी तात्काळ तांत्रिक तपासणी करावी. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करून ग्रामस्थांना माहिती द्यावी. पाणीपुरवठ्यात भेदभाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व लोकप्रतिनिधींवर चौकशी करून योग्य कारवाई करावी. ग्रामपंचायत मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत असल्यास कर वसुली स्थगित करावी, अशी मागणी केली आहे.


पत्रकार सुर्वे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, पिण्याचे पाणी ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आणि अधिकार आहे. गावातील नागरिकांना न्याय मिळावा, पाण्याचा नियमित आणि समप्रमाणात पुरवठा व्हावा, हीच आमची नम्र विनंती आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.


या निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच ग्रामसेवक हाळ खुर्द यांना देण्यात आली आहे. निवेदन प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाकडून लवकरच पाहणी आणि तपासणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हाळ खुर्द ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा केवळ तांत्रिक नाही तर प्रशासकीय आणि उत्तरदायित्वाचा मुद्दा बनला आहे. पत्रकार खलील सुर्वे यांनी दिलेले निवेदन या समस्येवर प्रशासनाला जाग आणणारे ठरेल आणि ग्रामस्थांना न्याय मिळावा अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.


Post a Comment

0 Comments