* आमदार महेश बालदी यांनी दिलेला कोट्यवधींचा निधी वाया!
* महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संघर्षात नुकसान
* वयाळ-लोधीवली रस्ता मोजतोय शेवटच्या घटका
* संतप्त ग्रामस्थांचे तहसील प्रशासनाला निवेदन
खालापूर / अर्जुन कदम :- खालापूर तालुक्यातील वयाळ ते लोधीवली हा महत्त्वाचा मार्ग दोन शासकीय विभागांच्या संघर्षात सापडल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. आमदार महेश बालदी यांनी या रस्त्याच्या दुरुस्ती व विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून दिला असतानाही, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एम.जे.पी.) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यांच्या परस्पर दुटप्पी भूमिकेमुळे रस्त्याचे काम रखडले असून, ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
वयाळ–लोधीवली मार्गावरून दररोज विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी प्रवास करतात. या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाईपलाईनचे काम सुरू आहे. मात्र, पाईप टाकताना रस्त्याची माती व खडी उकरून टाकण्यात आली आणि पुनर्भरणाची योग्य व्यवस्था न झाल्याने आता संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी पोखरलेला आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघातांच्या घटनाही वाढल्या आहेत. शाळकरी मुलांच्या प्रवासाला धोका निर्माण झाल्याने काही महिन्यांपूर्वी भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांनी स्वखर्चाने रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र प्रशासनाची कुंभकर्णी झोप अजूनही कायम आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की, हा रस्ता आमच्या मालकीचा आहे. त्याच वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग सांगतो की, रस्ता आमचा आहे, पण पाईपलाईनमुळे तो खराब झाला. या परस्पर संघर्षात सामान्य नागरिक आणि ग्रामस्थ मात्र अक्षरशः पिचले गेले आहेत. दोन-तीन वर्षे चाललेले हे पाईपलाईन काम अद्याप पूर्णत्वाला गेलेले नाही. यामुळे ग्रामस्थांना दररोज चिखल, धूळ, खड्डे आणि धोका यांना सामोरे जावे लागत आहे.
आमदार महेश बालदी यांनी या रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी संबंधित विभागांना वारंवार योग्य सूचना दिल्या असून, ग्रामस्थांच्या हिताचा योग्य मार्ग काढून काम पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देशही दिले आहेत. मात्र, दोन्ही विभागांतील अकार्यक्षमता आणि समन्वयाचा अभाव यामुळे हा निधी प्रत्यक्ष कामात वापरला गेला नाही. निधी पडून राहिला असून, ग्रामस्थ मात्र त्रास सहन करत आहेत.
या समस्येवर संतप्त ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक सचिन पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर लवकरच काम सुरू झाले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू!
या निवेदनावेळी उपसरपंच रोशन गायकवाड, प्रमोद पवार, अनिल पवार, अर्जुन पवार, समीर म्हात्रे, रुपेश पवार, अक्षय म्हात्रे, देवा पवार, नितीन ठाकूर, भूषण म्हात्रे, जयेश ठाकूर, सुरेश देशमुख, दिगंबर मापाडी, प्रदीप गायकवाड, राहुल गायकवाड, मारुती पवार, सागर म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, नारायण पवार, प्रसाद पवार, समीर पवार, जय पवार, संतोष पाटील, अमर ठाकूर, भरत म्हात्रे, अनंता म्हात्रे, रोहित ठाकूर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या भावनांना न्याय मिळावा यासाठी आता आमदार महेश बालदी यांनाही प्रत्यक्ष भेटून रस्त्यावरील गुंता तातडीने सोडवावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
Post a Comment
0 Comments