* शिक्षकांना अखेर कर्जत तालुक्यात रुजू होण्याचा मार्ग मोकळा
* प्रशासनाला जाणीव करून देणाऱ्या ठाम लढ्याचे फळ
कर्जत / नरेश जाधव :- कर्जत तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत झालेल्या जाणीवपूर्वक अन्यायाविरोधात भाजप नेते माजी आमदार सुरेश लाड यांनी छेडलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या दालनात सकाळपासून सुरु असलेल्या या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत शिक्षकांना कार्यमुक्त होण्याचे आदेश रात्री उशिरा देऊन न्याय दिला.
* अन्यायाविरोधातील ठाम भूमिका – शिक्षकांना दिलासा :- सुरेश लाड यांनी आंदोलनाच्या वेळी प्रशासनाकडे ठामपणे मागणी केली की, कर्जत तालुक्यातील शिक्षकांची बदली एका मंत्र्याच्या मर्जीपोटी रोखली गेली असून, ही कारवाई पूर्णपणे अन्यायकारक आहे. शिक्षक हे समाजाचे दिशादर्शक असून, त्यांना राजकीय हेतूंनी त्रास देणे हे गैर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्हा शिक्षण अधिकारी ललिता दहितूले यांनी तत्काळ कारवाई करीत श्रीवर्धन तालुक्यातील संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त होण्याचे आदेश लेखी स्वरूपात रात्री 11 वाजता दिले. त्यामुळे कर्जत तालुक्यात त्या शिक्षकांना रुजू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
* सुरेश लाड यांचा लढा-अन्यायाविरुद्धचा आवाज :- माजी आमदार लाड यांनी नेहमीच सामान्य शिक्षक, कर्मचारी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढा दिला आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवून त्यांनी पुन्हा एकदा आपली जनतेशी असलेली बांधिलकी सिद्ध केली आहे. त्यांनी सांगितले की, शिक्षक हे गावागावातील ज्ञानदीप आहेत. त्यांना राजकीय कारणांसाठी त्रास देणे हे शिक्षणव्यवस्थेवर अन्याय आहे. आमच्या आंदोलनानंतर प्रशासन जागे झाले, हे लोकशक्तीचे यश आहे.
या आंदोलनावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद (पपुशेठ) पाटील, ॲंड. महेश मोहिते, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, जीवन गावंड यांसह विविध मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते. सर्वांनी सुरेश लाड यांच्या या आंदोलनाचे समर्थन करीत शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी एकमुखी भूमिका घेतली.
Post a Comment
0 Comments