* धर्माच्या नावावर उभ्या केलेल्या आर्थिक मोहिमा समाजाला कुठे नेत आहेत?
भारत आज जगाच्या नकाशावर महाशक्ती होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. पण दुर्दैवाने, या उंबरठ्यावर उभे असतानाच आपण आपले घर फोडत आहोत. सध्या देशभर एक मोहीम जोरात सुरू आहे. “हिंदूंनी हिंदू दुकानदारांकडून खरेदी करावी, मुस्लिम दुकानदारांकडून खरेदी करू नये.” हा संदेश सोशल मीडियावर, व्हॉट्सअॅपवर, फेसबुक पोस्टमध्ये फिरताना दिसतो. अनेक ठिकाणी यामुळे समाजात एक अदृश्य दरी निर्माण होत आहे आणि प्रश्न एकच आहे, आपण खरोखर पुढे चाललो आहोत का, की मागे फिरत आहोत?
* धर्माच्या भिंतींवर उभे राहिलेले समाज कधी उंच भरारी घेत नाहीत :- जे देश धर्माच्या नावावर उभे राहिले, त्यांनी आपलेच भविष्य उद्ध्वस्त केले आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, नेपाळ यांसारख्या देशांकडे पाहा...धर्मावर आधारित राष्ट्र म्हणून निर्माण झाले, पण आज त्या देशांची अर्थव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था दोन्ही ढासळलेले आहेत. त्यांच्या समाजात फूट पडली, विचार थांबले, व्यापार गेला आणि तरुण बेरोजगार झाले. आणि आपण, ज्यांनी जगाला शांती, सहिष्णुता आणि मानवता शिकवली, तेच आता ‘कोणाकडून खरेदी करायची’ या पातळीवर आलो आहोत ? धर्म ही वैयक्तिक श्रद्धा आहे, व्यापार हा सामाजिक व्यवहार आहे, या दोन गोष्टींची गल्लत समाजविध्वंसाचे बीज आहे.
* आर्थिक स्वावलंबन म्हणजे बहिष्कार नव्हे, सहकार्य आहे :- आपल्या समाजात काही व्यापारी, काही उद्योगपती आहेत जे आपल्या मेहनतीने उभे राहिले. ते हिंदू असोत, मुस्लिम असोत, शिख, ख्रिश्चन असोत - ते सर्व या भूमीचे पुत्र आहेत. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावला आहे, कर भरला आहे, कामगारांना पगार दिला आहे. ते देशद्रोही नाहीत. मग त्यांच्यावर धार्मिक शिक्कामोर्तब का ?
आर्थिक स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या समाजातील लोकांनी व्यवसाय करावा, उद्योजक व्हावं, शिक्षण घ्यावं, उत्पादन वाढवावं, पण त्याचवेळी दुसऱ्याला खाली खेचणं, दुसऱ्याच्या दुकानावर कुलूप लावणं, त्याच्या घरावर बहिष्काराची सावली टाकणं, हे राष्ट्रहित नव्हे, राष्ट्रविघातक वर्तन आहे.
* स्वावलंबनाचा खरा अर्थ - आपले उभे करणे, दुसऱ्याला पाडणे नव्हे :- जर एखादा समाज प्रगती करतो, तर त्याला पाहून आपण प्रेरणा घ्यायला हवी, स्पर्धा करायला हवी, पण द्वेष नाही. आपण आपल्या धर्मातील व्यापाऱ्यांना प्रोत्साहन द्या, त्यांच्याकडून खरेदी करा, यात गैर काहीच नाही. पण त्याचवेळी दुसऱ्याला आर्थिक गळफास घालायचा, त्याचा धंदा संपवायचा...हा हिंदुस्तानचा मार्ग नाही.
भारताची शक्ती विविधतेत एकता आहे आणि हीच विविधता आपल्याला चीनसारख्या एकरंगी देशांपासून वेगळं करते.
* बाबासाहेबांचा विचार - बहिष्कार नव्हे, समता आणि न्याय :- महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होते की, जर समाजाने एकमेकांवर बहिष्कार टाकायला सुरुवात केली, तर लोकशाहीची मुळे सडतील.
भारतीय राज्यघटनेत बहिष्कार हा गुन्हा आहे, कारण तो माणसाला माणसापासून वेगळे करतो. घटनेचा आत्मा सांगतो की, धर्म, जात, वंश, भाषा किंवा पंथ यांच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही. मग आपण स्वतःला ‘घटनेचा भक्त’ म्हणवतो आणि त्याचवेळी घटनेविरुद्ध जाणारा बहिष्कार करतो, हे दुहेरी चेहरेपण नव्हे का ?
* आपण खरोखर कुणाचा विरोध करतो आहोत ? :- आज ज्यांच्यावर बहिष्कार टाकतो आहोत, ते आपल्याच गावात राहणारे, आपल्याच मुलासोबत शाळेत शिकणारे, रुग्णालयात रक्तदान करणारे लोक आहेत. त्यांचा पाकिस्तानशी काही संबंध नाही. ते सुद्धा तुमच्यासारखेच घर चालवण्यासाठी झटत आहेत.4-5 दहशतवादी जे धर्माच्या नावावर रक्त सांडतात, त्यांच्यामुळे आपण 40 कोटी लोकांवर संशय घ्यायचा? हे तर शत्रूच्या हातात खेळणं देणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, पण देशातील सर्व मुसलमानांवर गोळ्या झाडल्या नाहीत. कारण त्यांना माहिती आहे...शत्रूला धडा शिकवायचा असतो, आपले घर जाळायचे नसते.
* धर्माने नव्हे, मानवतेने विचार करा :- आई आपल्या मुलांमध्ये कधी भेद करत नाही, मग भारत माता सुद्धा आपल्या मुलांमध्ये भेद करेल का? “हिंदू माझा, मुस्लिम परका” - हा विचार भारताचा नाही. भारत म्हणतो, “वसुधैव कुटुंबकम्” अर्थात म्हणजे संपूर्ण जग आपले कुटुंब आहे.
जर कुणी तुम्हाला सांगत असेल की “फक्त आपल्या धर्मातला व्यापारीच खरा” तर त्याला विचारा, “माझ्या मुलीच्या लग्नाला, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, माझ्या कर्जासाठी तू मदत करशील का?” जर तो खरोखर धर्माचा आहे, तर तो मदत करेल. पण जर तो फक्त द्वेष पसरवण्यासाठी धर्म वापरत असेल, तर तो शांत बसेल. धर्म तोच खरा जो दुसऱ्याचे दु:ख पाहतो आणि हात देतो.
* कायदा आणि विवेक - राष्ट्राची खरी दिशा :- आज देशात अनेक कायदे आहेत जे ग्राहकांचे, व्यापाराचे आणि मानवाधिकारांचे रक्षण करतात. कोणत्याही धर्माच्या नावाने एखाद्याला बहिष्कृत करणे, धमकावणे, व्यवसायात अडथळा आणणे हे गुन्हा आहे. आणि जर समाजाने यालाच सामान्य मानलं, तर एक दिवस हा गुन्हा सवयीचा होईल. तेव्हा आपल्या लोकशाहीचा श्वास गुदमरून मरेल.
* राष्ट्रहितात एकच धोरण - “सहजीवन, सहकार्य, समृद्धी” :- आपण देशभक्त आहोत, पण देशभक्ती म्हणजे झेंडा उचलणे नाही तर आपल्या देशबांधवाला साथ देणे आहे. हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन सगळे या भूमीचे रक्त-मातीचे आहेत. त्यांना वेगळं करून आपण महाशक्ती होऊ शकतो का? नाही.
आपण महाशक्ती तेव्हाच होऊ, जेव्हा गावातील प्रत्येक घरात प्रकाश, प्रत्येक कुटुंबात रोजगार, आणि प्रत्येक हृदयात आदर असेल.
* बहिष्कार नव्हे, जागृती करा :- समाजप्रबोधन म्हणजे द्वेष नव्हे. आपल्या तरुण पिढीला सांगू या - खरा देशभक्त तो नाही जो दुसऱ्याचा बहिष्कार करतो, तर तो आहे जो दुसऱ्याला हात देतो आणि एकत्र प्रगती करतो.
आज आपल्याला बहिष्काराचं नव्हे, सहकार्याचं नोबेल पारितोषिक मिळायला हवं. जग आपल्याला “विभाजनाचा” नव्हे तर “एकतेचा” आदर्श म्हणून पाहील, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने भारत म्हणवू.
🖋️फिरोज पिंजारी (संपादक - दै. कोकण प्रदेश न्यूज)(जनजागृती आणि समाजप्रबोधनासाठी समर्पित)
Post a Comment
0 Comments