* नगरदेवळा मतदार संघात किरण काटकर विरुद्ध रावसाहेब पाटील - जळगाव जिल्ह्याची हॉट सिट ठरणार ?
* शिंदे गट व भाजप आमनेसामने ; स्वाभिमान विरुद्ध संघटन असा सामना रंगण्याची चिन्हे ?
जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग वाजण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, नगरदेवळा जिल्हा परिषद मतदार संघात राजकीय तापमान तुफान वाढले आहे. येथील शिवसेना शिंदे गटाचे मनोहर गिरधर पाटील उर्फ रावसाहेब जिभू आणि भारतीय जनता पार्टीचे संभाव्य उमेदवार किरण निळकंठ काटकर यांच्यात थेट सामना रंगणार असल्याची शक्यता प्रबळ झाली आहे.
आता सगळ्यांच्या तोंडी एकच चर्चा आहे की, किरण काटकर विरुद्ध रावसाहेब पाटील — कोण ठरेल नगरदेवळ्याचा विजेता ?
पाचोरा तालुका हा शिवसेनेच्या शिंदे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. येथील आमदार किशोर आप्पा पाटील हे मतदारांच्या मनात “अनभिषिक्त सम्राट” म्हणून ओळखले जातात. त्यांचा करिष्मा, संघटनावरची पकड आणि गावागावातील संपर्क या सगळ्यामुळे शिंदे गटाची पकड घट्ट असल्याचे चित्र आहे. त्यातच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील (जिभू) यांचा या मतदारसंघात मजबूत दबदबा आहे. गावोगावी त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते, जुने शिवसैनिक आणि ग्रामपातळीवरील नेटवर्क असल्यामुळे त्यांना हलके घेणे कोणालाच शक्य नाही.
दुसरीकडे, भाजपकडून चर्चेत असलेले किरण निळकंठ काटकर सर हे शिक्षण, सेवा आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या कुटुंबाला मोठा राजकीय वारसा आहे. काका अरुण आबा काटकर गावाचे सरपंच राहिलेले, तर सध्या त्यांच्या पत्नी प्रतिक्षा किरण काटकर गावाच्या सरपंचपदी कार्यरत आहेत. काटकर कुटुंबाचा विश्वासार्हतेचा ब्रँड आजही टिकून आहे. नगरदेवळा, बाळद, पंचायत समिती गण व जिल्हा परिषद मतदार संघ व पाचोरा तालुक्यात त्यांचा मोठा जनाधार आहे. त्यातच मागील काही महिन्यांत भाजपात माजी आमदार दिलीप वाघ आणि माजी आमदार आर. ओ. तात्या यांच्या कन्या वृषाली पाटील सुर्यवंशी यांच्या प्रवेशाने भाजपचा पाया पाचोरा विधानसभा मतदारसंघात अधिक मजबूत झाला आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन स्वतः या मतदारसंघात लक्ष देणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्या रणनीतीचा अनुभव आणि “संगठन कौशल्य” यामुळे नगरदेवळा मतदारसंघ हा थेट राज्यस्तरीय लक्षवेधी रणांगण ठरू शकतो. महाजन यांच्या हस्तक्षेपाने भाजपच्या स्थानिक पातळीवरील अंतर्गत समीकरणातही नवा जोश आला आहे.
नगरदेवळा पंचायत समिती गण आणि बाळद गण या दोन्ही प्रभागांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात अनेक इच्छुकांची नावे फिरत असली तरी खरा सामना किरण काटकर विरुद्ध रावसाहेब पाटील (जिभू) असा होण्याचीच शक्यता आहे. गावात टपरीवर, चौकात, बाजारात, अगदी कार्यकर्त्यांच्या गप्पांमध्येही एकच चर्चा 'किरण सर की रावसाहेब जिभू ?' अशीच चर्चा आहे.
राजकीय सूत्रांच्या मते, जर किरण काटकर यांनी पक्षनिर्णयानुसार जिल्हा परिषद निवडणूक लढवली नाही, तर त्यांच्या पत्नी आणि सध्याच्या सरपंच प्रतिक्षा किरण काटकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावातील प्रचार मोहीम आणि चर्चा आता “घराणं विरुद्ध घराणं” अशा नव्या रूपात दिसू लागली आहे.
गावातील काही नागरिक खुलेपणाने म्हणतात की, आम्हाला गावाचा माणूस हवा, पक्षाचं झेंडा नाही.. म्हणूनच “गावाचा उमेदवार, गावाचा स्वाभिमान” ही घोषवाक्ये अनेक चौकात, चर्चांमध्ये आणि सोशल मीडियावर उमटताना दिसतात. या भावनेचा परिणाम मतदानावर थेट होणार, हे स्पष्ट आहे.
नगरदेवळा जिल्हा परिषद मतदारसंघ हा केवळ निवडणूक नव्हे, तर “स्थानिक नेतृत्व विरुद्ध संघटनशक्ती” असा संघर्ष ठरणार आहे. रावसाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा जिव्हाळा आणि शिंदे गटाचे बळ यांच्याशी सामना करणारे काटकर कुटुंब हा खरा कसोटीचा क्षण असेल. गिरीश महाजन यांच्या रणनीतीने भाजपचा खेळ तेजीत जाईल, तर किशोर आप्पा पाटील यांच्या पाठबळाने शिंदे गटही डगमगणार नाही. नगरदेवळा मतदारसंघ हे या निवडणुकीचं राजकीय हॉटस्पॉट ठरणार, याबद्दल कोणालाही शंका नाही, हे मात्र खरे!
- फिरोज पिंजारी (संपादक - दै. कोकण प्रदेश न्यूज)
Post a Comment
0 Comments