Type Here to Get Search Results !

शिवाजी जाधव यांच्या विकासकामाचा बॅनर गायब - कुणाचा डाव ?

* रातोरात बॅनर उडाला...नागरिकांत खळबळ, राजकीय खुन्नस की केवळ चोरी ? पोलिसांचा तपास सुरू

* विकास दिसायला नको म्हणून बॅनर गायब केला का ? यशवंत नगरमध्ये राजकीय वादळ!

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील यशवंत नगर दोन नंबर परिसरात अचानक एका रहस्यमय घटनेने खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार तथा प्रभाग क्रमांक 10 चे इच्छुक उमेदवार शिवाजी जाधव यांनी केलेल्या विकासकामाचा मोठा बॅनर रातोरात गायब झाला आणि आता या प्रकाराने केवळ “बॅनर चोरी” नव्हे, तर राजकीय डावपेचाची झलक असल्याची चर्चा संपूर्ण परिसरात जोर धरू लागली आहे.


14 ऑक्टोबरच्या सकाळी समाजमंदिर रोडवर विकासकामाचं कौतुक करणारा बॅनर लावण्यात आला होता. त्या बॅनरवर प्रभागातील रस्ते, गटारी, प्रकाशयोजना, आणि चालू प्रकल्पांची माहिती देण्यात आली होती. परंतु अवघ्या काही तासांतच बॅनर गायब झाला.  कोणी काढला ? का काढला ? आणि कोणाच्या सांगण्यावरून काढला ? याचा थांगपत्ता नाही. यामुळे स्थानिक रहिवासी आणि शिवाजी जाधव यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. विकास दिसायला नको म्हणूनच बॅनर उडवला...काम थांबवता येत नाही, म्हणून बॅनर गायब केलाय, असे बोल लोकांच्या तोंडी ऐकू येत आहेत.


या घटनेनंतर राजकीय वर्तुळात “ही केवळ बॅनर चोरी नाही तर राजकीय खुन्नस आहे” अशी चर्चा रंगली आहे. शिवाजी जाधव हे प्रभाग क्रमांक 10 मधील सक्रिय नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामं पूर्णत्वाला गेली, आणि नागरिकांचा विश्वास वाढला. मात्र, हेच काहींना डोळ्यात खुपलं. विकासाचं श्रेय दुसऱ्यांना मिळू नये म्हणून बॅनर गायब केला गेला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.


या घटनेनंतर शिवाजी जाधव यांनी अधिकृत तक्रार खोपोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवले असून, काही संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवले आहे. बॅनर हटवण्यामागे कोणाचं राजकीय कारण आहे का ? याचा तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले असून, दोषी सापडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.


घटनेनंतर सोशल मीडियावर जणू ज्वालामुखीच फुटला आहे. विकास थांबवता येणार नाही, बॅनर नाही तर जनता बोलते! #खोपोलीचा_अभिमान #शिवाजीभाऊ_सतत_सेवेत ...अशा हॅशटॅगने नेटिझन्सनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही नागरिकांनी थेट असा सवाल उपस्थित केला आहे की, जर विकासाची कामे लोकांपर्यंत पोहोचवणे चुकीचे असेल, तर मग पारदर्शकतेचा अर्थ काय उरला ?


या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवाजी जाधव म्हणाले की, मी बॅनर चोरीची तक्रार दिली आहे. पण माझा हेतू केवळ बॅनर लावण्याचा नव्हता तर नागरिकांना कामांची माहिती देण्याचा होता. काहींना हे काम डोळ्यात खुपत असेल, पण विकास थांबणार नाही. त्यांच्या या वक्तव्याने समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या..“काम बोलतंय... बॅनर नाही तरी जनता जागी आहे!”


खोपोलीतील आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना नवी राजकीय हलचल निर्माण करणारी ठरली आहे. स्थानिक नेत्यांमध्ये “कुणाचा डाव ?” या प्रश्नावर कुजबुज सुरू आहे. काहींचे मत आहे की हा प्रकार जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राजकीय निरीक्षकांचं मत स्पष्ट आहे की, जाधव यांच्या प्रभागात झालेल्या विकासकामांमुळे त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांनी बॅनर हटवून संदेश द्यायचा प्रयत्न केला असावा. खोपोलीसारख्या शहरात जर विकासाच्या कामांना अडथळे आणले जात असतील, तर ती फक्त बॅनरची चोरी नाही तर ती लोकशाहीवरची छेडछाड आहे.


Post a Comment

0 Comments