Type Here to Get Search Results !

रायगडात अट्रॉसिटी गुन्ह्यांचे प्रमाण अत्यल्प - गोरक्ष लोखंडे

रायगड-अलिबाग / प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये (अट्रॉसिटी) गुन्हे घडण्याचे प्रमाण घटले असून जिल्ह्यात चालू वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत या कायद्यान्वये चार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या वर्षात एकूण 31 गुन्हे नोंदविले गेले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी सक्षमपणे काम करावे. महाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2024 साली घडलेल्या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, सहाय्यक समाजकल्याण आयुक्त सुनील जाधव उपस्थित होते.

     

रायगड जिल्ह्यातील नगर परिषदा, नगर पालिका, नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येणाऱ्या मागासवर्गीयांसाठीच्या विविध योजना, नोकरभरती, अनुकंपा तत्वावरील प्रकरणे, समाजकल्याण विभागाकडून येणाऱ्या निधीचा वापर, आर्थिक दुर्बल घटकांवर होणारा खर्च, दलित वस्ती, रमाई आवास घरकुल योजना, लाड पागे प्रलंबित प्रकरणे याबाबत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.

      

रायगड जिल्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हे घडण्याचे प्रमाण घटले आहे. चालू वर्षात नऊ महिन्यांमध्ये चार गुन्हे नोंदविण्यात आले आहे. 1995 ते 2025 या कालावधीत जिल्ह्यात 789 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी रायगड जिल्ह्यात चांगल्या प्रकारे केली जात आहेत. समाजकल्याण विभागाचा निधीचा वापर देखील योग्य प्रकारे केला जात आहे. 

     

राज्यातील 26 जिल्ह्यांचा आढावा घेतला असून रायगड हा 27 वा जिल्हा आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिल्ह्याची कामगिरी समाधानकारक असून सर्व योजना चांगल्या प्रकारे राबविल्या जात आहेत, असेही गोरक्ष लोखंडे यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments