Type Here to Get Search Results !

अस्मानी संकट आणि शेतकरी : मातीशी नातं ठेवणारा जिवंत देवदूत

शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे, परंतु आज या कण्यालाच अस्मानी संकटाने वाकवून ठेवले आहे. निसर्गाचा कोप, हवामानातील अनिश्चितता, पावसाची बेभरवशाची चाल आणि त्यातून निर्माण झालेली आर्थिक बिकट परिस्थिती या सगळ्यामुळे शेतकऱ्याचे आयुष्य जणू एका न संपणाऱ्या संघर्षात अडकले आहे. एकेकाळी ‘आषाढात पेरणी आणि श्रावणात हिरवळ’ ही म्हण खरी ठरत होती, पण आता हवामान बदलाच्या सावटाखाली ही म्हण फिकट पडली आहे. पाऊस वेळेवर न पडणे, अचानक अतिवृष्टी होणे, गारपिटीचा तडाखा बसणे या अस्मानी संकटांनी शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कधी दुष्काळाचे सावट, तर कधी पूरस्थिती अशा दोन्ही टोकांमध्ये शेतकरी झुलत आहे.

          

माणूस शहरात छत्री घेऊन पावसापासून वाचतो, पण शेतकरी मात्र त्या पावसाची वाट बघत असतो. अस्मानी संकट म्हणजे फक्त आकाशातून कोसळणारा पाऊस नव्हे ; ते म्हणजे शेतकऱ्याच्या मनावर कोसळणारी काळजी, त्याच्या भविष्यावर आलेलं सावट आणि त्याच्या जगण्याचा तुटलेला धागा. निसर्गाचा कोप, आशेचा अपघात कधी दुष्काळाने भूमी फाटते, तर कधी अतिवृष्टीने पिकं वाहून जातात. गारपीट, वादळ, पूर या प्रत्येक घटनेसोबत शेतकऱ्याचे हृदयही मोडते. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक ऋतू ही परीक्षा ठरते.

         

पेरणीच्या वेळी आशा असते, पण कापणीच्या वेळी नेहमीच भीती. कारण निसर्गाचा एक कोप आणि वर्षभराच्या घामाचे स्वप्न एक क्षणात उद्ध्वस्त! शेतकरी घामाचं सोनं करतो पण त्याला मोबदला मातीचा मिळतो. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो, भूमीला जीव देतो, पण त्याला त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. तो जमिनीवर घाम गाळतो, जीव ओततो, पण त्याला मिळतो फक्त तोट्याचा हिशेब. पिक बुडालं तर विमा कंपन्या हात झटकतात, नुकसान भरपाई मिळेपर्यंत कर्जाचे ओझे वाढते. एकीकडे बँकेचे नोटिसांचे सावट, तर दुसरीकडे घरच्यांच्या पोटाची जबाबदारी या द्वंद्वात शेतकरी तुटत चालला आहे. पिकांचं दर घसरतो, विमा मिळत नाही आणि मग तोच शेतकरी, जो अन्नदाता आहे, तो स्वतःचं अन्न मिळवण्यासाठी झगडतो. हे केवळ अन्याय नाही, ही व्यवस्थेची संवेदनशून्यता आहे.

         

शासन अनेक योजना जाहीर करते विमा योजना, अनुदाने, कर्जमाफी, परंतु त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच फाईल्सच्या दलदलीत अडकतात. मदतीचा लाभ मिळेपर्यंत शेतकऱ्याची आशा कोरडी पडते. शासनाकडून मिळणारी मदत ही ‘सहानुभूती’ नसून ‘न्याय’ असायला हवी. प्रत्येक वेळी नवनवी योजना, घोषणा आणि मदतीच्या आश्वासनांचा पाऊस पडतो. पण त्या थेंबांमध्ये शेतकऱ्याला आधार नाही, तर फसवणूक असते. शासनाच्या घोषणा आशेची पतंग की दिखाऊ फुगा! नुकसानीचे पंचनामे, कागदपत्रं, अर्ज या सगळ्या प्रक्रियेत शेतकऱ्याचं आयुष्य फाईलमध्ये अडकून राहतं. त्याला हवी आहे तत्काळ मदत, खऱ्या अर्थाने न्याय आणि मानवी संवेदना. अस्मानी संकटाने कितीही तडाखे दिले, तरी शेतकरी पुन्हा उभा राहतो. त्याच्या हातात माती असते, पण मनात विश्वास असतो “पाऊस येईल, पिकं येतील.” ही आशा म्हणजे भारतीय कृषी संस्कृतीचं प्रतीक आहे. परंतु या आशेचा गैरफायदा घेणं थांबवलं पाहिजे. निसर्गाने कितीही तडाखे दिले, तरी शेतकरी पुन्हा मातीशी नातं जोडतो. त्याच्या अंगावर कर्जाचं ओझं असतं, तरीही तो नव्या पिकाचं स्वप्न पाहतो. कारण त्याला माहीत आहे. मातीचा वास म्हणजे जीवन आणि आशा म्हणजेच शेती तरीही उभा राहणारा शेतकरीच. आपण शहरात अन्न खातो पण त्या अन्नामागे कोणाचा घाम आहे हे विसरतो. शेतकरी केवळ उत्पादक नाही, तो जीवनदाता आहे. त्याचं जगणं सुरक्षित असलं, तर देशाचं उद्याचंही सुरक्षित राहील. म्हणूनच समाजाने आणि शासनाने मिळून या अस्मानी संकटाला मानवी संवेदनांनी उत्तर द्यायला हवं.

         

हवामानाच्या बदलत्या परिस्थितीनुसार शाश्वत शेती पद्धती राबविणे आवश्यक आहे. विमा यंत्रणेतील सुधारणा व्हावी व नुकसानीचे वास्तव मूल्यांकन करून तत्काळ मदत मिळावी. कृषी शिक्षण आणि प्रशिक्षण: नवीन तंत्रज्ञान, जलसंवर्धन, आणि जैविक शेती यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. बाजारभाव स्थिरीकरण होऊन मध्यस्थांच्या ऐवजी थेट ग्राहकांपर्यंत शेतकऱ्याचे उत्पादन पोहोचावे. शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून भूमीला फुलवतो, पण उत्पादन वाढलं तरी उत्पन्न वाढत नाही. पिकांच्या दरातील अनिश्चितता, बाजारपेठेतील मध्यस्थांची लूट आणि विमा कंपन्यांच्या कारभारातील त्रुटी या सगळ्यांनी शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिकच कमकुवत झाला आहे. अलिकडच्या काही वर्षांत पावसाच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल झालेला दिसतो. कधी पाऊस उशिरा येतो, तर कधी काही दिवसांतच एवढा कोसळतो की संपूर्ण हंगामाची समीकरणे बिघडतात. त्यातच गारपीट आणि वादळासारख्या आपत्तीमुळे शेतकऱ्याच्या मेहनतीचा सगळा मातीमोल होतो. फक्त तात्पुरती मदत पुरेशी ठरणार नाही. हवामान बदल लक्षात घेऊन शेतीला वैज्ञानिक व तंत्रज्ञानाधारित स्वरूप देणे गरजेचे आहे. जलसंधारण, पाण्याचा तर्कशुद्ध वापर, हवामाननिष्ठ शेती पद्धती आणि थेट ग्राहकांपर्यंत विक्री यांसारख्या उपायांवर भर दिला पाहिजे. विमा योजनांना सुलभ आणि पारदर्शक बनविणे अत्यावश्यक आहे. फक्त तात्पुरती मदत पुरेशी ठरणार नाही. हवामान बदल लक्षात घेऊन शेतीला वैज्ञानिक व तंत्रज्ञानाधारित स्वरूप देणे गरजेचे आहे. जलसंधारण, पाण्याचा तर्कशुद्ध वापर, हवामाननिष्ठ शेती पद्धती, आणि थेट ग्राहकांपर्यंत विक्री यांसारख्या उपायांवर भर दिला पाहिजे. विमा योजनांना सुलभ आणि पारदर्शक बनविणे अत्यावश्यक आहे.

          

अस्मानी संकट हे थांबवता येणार नाही, पण त्याचा परिणाम कमी करता येऊ शकतो. यासाठी शासन, समाज आणि शेतकरी तिघांनीही एकत्र येऊन उपाययोजना राबवायला हव्यात. शेतकऱ्याच्या घामाने या भूमीला अन्न मिळतं, म्हणूनच त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आकाश काळं झालं तरी पेरणी थांबत नाही, कारण शेतकरी आशेचा पेरणीवाला असतो. त्याच्या डोळ्यातली आस, त्याच्या मातीची ओल हाच आपल्या देशाचा खरा आत्मा आहे. तर चला, शेतकऱ्याच्या संघर्षाला सलाम करू या. कारण तो फक्त अन्नदाता नाही तर तो या भूमीचा श्वास आहे!

* प्रवीण बागडे , नागपूर (9923620919)


                

Post a Comment

0 Comments