Type Here to Get Search Results !

कर्जतच्या सावलीत तहानलेलं किरवली !

* पालीच्या धरणाजवळ, उल्हासच्या प्रवाहाजवळ... तरीही किरवली तहानलेले !

* 40 वर्षांचा दुर्लक्षाचा इतिहास - पाणीटंचाईचा कायमस्वरूपी उपाय नाहीच...नेते झोपले, अधिकारीही झोपले!

कर्जत / नरेश जाधव :- धरण शेजारी, नदी जवळ...आणि तरीही आमच्या घरात पाण्याचा थेंब नाही!  हे किरवली ग्रामस्थांचे हंबरडे आहे.

कर्जत तालुक्यातील किरवली हे गाव...लोकसंख्या अवघी दीड हजार, पण या छोट्या गावाने पाणीटंचाईच्या मोठ्या वेदना पिढ्यानपिढ्या सहन केल्या आहेत. वर्षानुवर्षे मातीचा बंधारा बांधला जातो, ग्रामस्थ स्वतः हाताने काम करतात, पण पाणी थांबत नाही... कारण बंधारा फक्त मातीचा, योजना कागदावरची आणि प्रशासन झोपलेले!


गावाचे पोलिस पाटील विवेक बडेकर आणि ग्रामस्थ गेली अनेक वर्षे स्वखर्चाने मातीचा बंधारा बांधत आहेत. प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की आशा जागते, “यावेळी तरी पाणी साठेल...” पण काही दिवसांनी माती वाहून जाते, आणि आशा पुन्हा कोरडी पडते. फेब्रुवारी महिना आला की नाल्यात पाणी नसतं, बोरवेल कोरडी पडते, बोअरींगचा आवाजही बंद होतो. गावातील माणसांना, त्यांच्या जनावरांनाही तहान भागवता येत नाही!


कर्जत शहर...रायगड जिल्ह्याचं राजकीय आणि प्रशासकीय केंद्र! येथे आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पक्षनिष्ठ नेते...सगळेच आहेत. पण त्यांच्या “विकासाच्या घोषणां”च्या सावलीत किरवली सारखी गावे अंधारात आहेत. पाली-भुतिवली धरण फक्त 6 - 7 किमीवर, उल्हास नदी 2 - 3 किमीवर, पेज नदी 10 - 15 किमीवर आणि किरवली मात्र पाण्याविना...विकासाचा मोठा डंका पिटणाऱ्यांना हे दिसत नाही का ? हे गाव त्यांच्या नकाशात नाही का ? असा प्रश्न नागरीक उपस्थित करीत आहेत.


मागील चार दशकांत सत्तेचा स्वाद सर्व पक्षांनी घेतला. कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी शिवसेना, तर कधी भाजप...सर्वांना संधी मिळाली, सर्वांनी आश्वासन दिले. पण पाणी नाही आले! निवडणूक आली की घोषणा येतात...“आम्ही पाईपलाईन टाकू”, “आम्ही कायमस्वरूपी उपाय करू” पण निवडणुका संपल्या की आश्वासनही आटतं. आज 2025 मध्येही किरवली तहानलेले आहे.


फक्त लोकप्रतिनिधीच नाहीत तर ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकारी, जलजीवन मिशनचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ या सगळ्यांचा निष्क्रियपणा ही पाणीटंचाईची दुसरी कारणे आहेत. जलजीवन मिशनसारख्या योजनांत कोट्यवधींचा निधी खर्च दाखविला जातो, पण तो पाणी घेऊन येत नाही! फक्त फाईल हलवतो, आणि पगार खातो ! ग्रामस्थांच्या व्यथा ऐकणारे कोणी नाही, तक्रारी ऐकून घेणारेही नाहीत. प्रशासन झोपा झोडतंय, आणि जनता पाण्याच्या थेंबासाठी तडफडते!


कर्जत तालुका हिरवळीसाठी आणि फार्महाऊससाठी ओळखला जातो. येथे पावसाचे प्रमाणही भरपूर आहे. तरीही किरवलीच्या वाट्याला कोरडे पाणी, कोरडी वचने आणि कोरडे प्रशासन!

“पाण्याच्या नजरेतून पाहिलं, तर किरवली म्हणजे दुष्काळाचं जिवंत रूप!” धरण भरलेलं असतं, नदी दुथडी वाहत असते, पण गावात पाण्याचा थेंबही पोहचत नाही. ही शासनाच्या अपयशाची लाजीरवाणी कहाणी आहे.


फेब्रुवारीनंतर किरवली गावातील अनेक कुटुंबं आपल्या मुलाबाळांसह गाव सोडतात. “पाणी नाही, जगायचं कसं ?” हा त्यांचा प्रश्न. पण हा प्रश्न राजकारण्यांच्या भाषणात नाही, अधिकाऱ्यांच्या अहवालात नाही, आणि शासनाच्या प्राधान्यक्रमात नाही. शासनाने नेहमीच टँकर पाठवला, पण उपाय नाही केला. किरवलीसारखी गावे ही प्रशासनाच्या उदासीनतेची साक्ष आहेत. नेते झोपले, अधिकारी झोपले... आणि जनता तहानलेली!

विकासाच्या गप्पा आता लोकांना चालत नाहीत. लोक पाण्याविना जगू शकतात, पण खोट्या घोषणांवर नाही. किरवलीसाठी फक्त पाणी नाही, तर न्यायाची तहान भागवण्याची वेळ आली आहे.


Post a Comment

0 Comments