* चार महिन्यांपासून मानधन थकीत - निधीअभावी आर्थिक संकट गहिरे ; शासनाकडे तातडीने तोडग्याची मागणी
उरण / विठ्ठल ममताबादे :- राज्य शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आनंदाऐवजी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण, गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या मानधनाचे पैसे थकलेले असून निधीअभावी परिस्थिती गंभीर बनली आहे. शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही काहीच तोडगा निघाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
* मानधन थकीत ; दिवाळी संकटात :- जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा तज्ञ, गट संसाधन केंद्र (BRC) कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर कंत्राटी कर्मचारी जुलै 2025 पासून आजपर्यंतच्या मानधनापासून वंचित आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, मानधन न मिळाल्याने घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणाचे शुल्क, आरोग्यावरील खर्च आणि दैनंदिन गरजा भागवणे अवघड झाले आहे. दिवाळी सणाच्या काळात आमचे घर अक्षरशः अंधारात राहणार आहे.
* जलजीवन मिशनची जबाबदारी, पण मोबदला नाही :- हे सर्व कर्मचारी जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन या केंद्र पुरस्कृत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने काम करीत आहेत. गावोगावी पाणीपुरवठा प्रकल्पांचे नियोजन, जल गुणवत्ता चाचण्या, जनजागृती मोहिमा यांसारख्या कामात ते दिवसरात्रं झटत असतात. तरी देखील त्यांना वेळेवर मानधन न मिळणे ही विरोधाभासात्मक व अन्यायकारक बाब असल्याचे त्यांचे मत आहे.
* शासनाकडून उडवाउडवीची उत्तरे :- कर्मचाऱ्यांनी सांगितले की, राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाशी वारंवार संपर्क साधूनही केवळ एकच उत्तर मिळते. ते म्हणजे केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झालेला नाही, त्यामुळे मानधन देणे सध्या शक्य नाही. या उत्तरामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
* शासनाला निवेदन - तातडीने निधी मंजुरीची मागणी :- या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, तसेच प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांना निवेदन सादर केले आहे. त्यात त्यांनी थकीत मानधन तातडीने मंजूर करून देण्याची आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
* दिवाळी सण उत्साहात नाही, कर्जात साजरा करावा लागेल :- कर्मचाऱ्यांनी भावनिक आवाहन करीत सांगितले की, आम्ही कमी मानधनावर काम करतो, पण प्रामाणिकपणे काम करतो. वेळेवर पगार न मिळाल्याने घर चालवणे अवघड झाले आहे. दिवाळी सण आनंदात साजरा करण्याऐवजी कर्ज काढून सण साजरा करावा लागेल.
* वाढता मानसिक ताण :- अनेक कर्मचारी सांगतात की, मानधन थकीत राहिल्याने मानसिक तणाव, कुटुंबात कलह आणि आर्थिक ताण वाढला आहे. काही कर्मचाऱ्यांनी तर नोकरी सोडण्याचा विचार सुरू केला आहे. आम्ही लोकांच्या पाण्यासाठी झटतो आहोत, पण आमच्याच घरी आता पाण्याऐवजी अश्रू वाहत आहेत, अशी भावनिक प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी दिली.
* कर्मचाऱ्यांची शासनाकडे कळकळीची मागणी :- कर्मचाऱ्यांचे स्पष्ट मत आहे की, शासनाने या प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहून तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. आम्ही सण साजरा करू शकू, आमच्या कुटुंबाचा आत्मविश्वास टिकवून ठेवू शकू, हेच आमचे विनम्र आवाहन आहे.
जलजीवन मिशनच्या माध्यमातून लाखो नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी झटणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सध्याची स्थिती मात्र अत्यंत दयनीय आहे. त्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न तातडीने सोडवला गेला नाही, तर राज्यभरातील जलजीवन मिशनची गती मंदावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Post a Comment
0 Comments