* खालापूर तालुका काँग्रेस विधी समितीचे प्रशासनास निवेदन
* दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न गंभीर ; परवान्याशिवाय फटाके विक्री रोखावी - ॲड. धावरे
खोपोली / प्रतिनिधी :- दिवाळी सण जवळ आल्याने खोपोली शहरात फटाके विक्रीच्या अनियंत्रित आणि अवैध व्यवसायावर नियंत्रण आणावे, अशी मागणी खालापूर तालुका काँग्रेस विधी समितीचे तालुकाध्यक्ष ॲंड. संदेश साहेबराव धावरे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, खालापूर तहसिलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, खोपोली पोलीस निरीक्षक आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांना सविस्तर लेखी निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काळात खोपोली शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध फटाके विक्री केली जाते. काही व्यापारी नगरपालिकेच्या गटारावर, रस्त्याच्या कडेला किंवा गाळ्यांच्या बाहेर मंडप टाकून फटाक्यांची दुकाने उभारतात. ही दुकाने कोणत्याही सुरक्षाविषयक नियमांचे पालन करत नाहीत, तरीही पोलीस आणि नगर परिषद प्रशासन कानाडोळा करताना दिसत आहे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
* निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे :-
1️⃣ फक्त परवानाधारक व्यापाऱ्यांनाच फटाके विक्रीस अनुमती द्यावी, आणि त्यांनी ती फक्त ठरवलेल्या जागीच करावी.
2️⃣ गजबजलेल्या आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्रीस बंदी घालण्यात यावी.
3️⃣ शासनाने बंदी घातलेले धोकादायक फटाके विकणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
4️⃣ रात्री दहा नंतर फटाक्यांची दुकाने बंद ठेवणे बंधनकारक करण्यात यावे.
5️⃣ सर्व परवाने आणि विक्री स्थळांची तपासणी करून गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात यावी.
6️⃣ एका परवान्यावर एकच दुकान चालविण्याची अट सक्तीने लागू करावी.
7️⃣ बाजारपेठ, खोपोली फाटा, रस्त्याच्या कडेला आणि नगर परिषदेच्या गटारावर विक्रीला बंदी घालावी.
8️⃣ मर्यादेपेक्षा जास्त फटाक्यांचा साठा आढळल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा.
9️⃣ आवाज मर्यादा पाळणारे फटाकेच विक्रीस परवानगी द्यावेत.
0️⃣ सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी.
* प्रशासनास आंदोलनाचा इशारा :- निवेदनात खालापूर तालुका काँग्रेस विधी समितीने इशारा दिला आहे की, जर या अवैध फटाके विक्रीवर प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही, तर खोपोली नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
ॲंड. धावरे यांनी म्हटले आहे की, दरवर्षी अशा अवैध फटाके विक्रीला खतपाणी घालणारे काही अधिकारी या साखळीत गुंतलेले दिसतात. जर या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले, आणि एखादी दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनावर असेल.
* सुरक्षेचा गंभीर प्रश्न :- निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जर भर बाजारपेठेत किंवा वर्दळीच्या ठिकाणी फटाके दुकानांना आग लागली, तर त्याचे भीषण परिणाम होऊ शकतात. अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस व नगर परिषद प्रशासनाने सक्रिय भूमिका घ्यावी, आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी पूर्वतयारी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
ॲंड. धावरे यांनी शेवटी नमूद केले की, लोकांच्या हितासाठी आणि शहरातील सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी. शासनाने नेमून दिलेल्या ठिकाणांशिवाय कुठेही फटाक्यांची विक्री होऊ नये. अवैध फटाके विक्रेत्यांना आळा घालण्यात यावा, हीच जनतेची मागणी आहे.
Post a Comment
0 Comments