Type Here to Get Search Results !

११ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, पण नंतर नाव गाजलं वादात - श्वेता बसु प्रसादचा संघर्षातून यशाकडे प्रवास!

* बालकलाकार ते विवादित अभिनेत्री...आणि आता ओटीटीवरील दमदार पुनरागमन

* श्वेता बसु प्रसादने दाखविला खऱ्या अर्थाने ‘कमबॅक’चा मार्ग!


मुंबई / प्रतिनिधी :- भारतीय सिनेमाचा झगमगता पडदा जितका आकर्षक आहे, तितकाच तो निर्दयीही ठरतो. काही कलाकार आपल्या बालवयातच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात, पण नंतर आयुष्यातील एका चुकीने किंवा गैरसमजाने त्यांचे करिअर डळमळते. अशाच एका संघर्षमय प्रवासाची कहाणी म्हणजे अभिनेत्री श्वेता बसु प्रसाद - ११ वर्षांच्या वयात राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी ही बालकलाकार नंतर वादात अडकली, पण पुन्हा उभी राहून सर्वांना थक्क करून गेली.


* ‘मकडी’मधून मिळाली ओळख :- २००२ साली विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘मकडी’ या चित्रपटातून श्वेताने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. फिल्ममध्ये तिने साकारलेली दुहेरी भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आणि त्या अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर ‘इकबाल’ सारख्या आशयघन चित्रपटांमधील तिच्या कामगिरीचेही प्रेक्षकांनी कौतुक केले. टेलिव्हिजन क्षेत्रात तिने ‘कहानी घर घर की’ सारख्या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारत लहान पडद्यावरही मजबूत स्थान निर्माण केले. तेलुगू सिनेमातही तिची ओळख ठळकपणे उमटली, विशेषतः ‘बंगारुलोकम’ या चित्रपटात तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.


* विवादांमध्ये अडकलेलं आयुष्य :- २०१४ साली श्वेताचे नाव एका मोठ्या वादात अडकल्याने तिचं करिअर मोठ्या धक्क्यात आलं. हैदराबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पोलिसांनी सेक्स रॅकेट प्रकरणी तिला अटक केली होती. माध्यमांनी तिला देहव्यापाराशी जोडत प्रचंड नकारात्मक प्रसिद्धी दिली. अर्थिक अडचणींमुळे ती या मार्गावर गेली, अशा अफवा पसरल्या. परंतु नंतर या प्रकरणातील खरा सूत्रधार पकडला गेल्यानंतर श्वेतावरचे सर्व आरोप निराधार ठरले.

तिने स्वतः स्पष्ट केले की ती अशा कोणत्याही गैरकृत्यात सहभागी नव्हती, आणि तिच्यावर झालेले आरोप पूर्णपणे खोटे होते. त्या वेळी तिचं वय केवळ २३ वर्षांचं होतं, आणि या घटनेने तिच्या करिअरवर खोल परिणाम झाला.


* वैयक्तिक आयुष्यातील वळणं :- वाद संपल्यानंतर काही वर्षांनी, २०१८ साली श्वेताने चित्रपट निर्माता रोहित मित्तल याच्याशी विवाह केला. मात्र, हा संसार फार काळ टिकला नाही आणि २०१९ साली दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तथापि, श्वेताने आपल्या सोशल मीडियावर स्पष्ट केले की विभक्त होऊनही दोघांमध्ये मित्रत्वाचे संबंध कायम आहेत आणि या सगळ्यातूनही तिने आपला आत्मविश्वास हरवला नाही.


* नवी ओळख - नवा प्रवास :- आज श्वेता बसु प्रसाद पुन्हा एकदा अभिनयाच्या जगात आपलं स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहे. तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘त्रिभुवन मिश्री : सीए टॉपर’, ‘इंडिया लॉकडाउन’ यांसारख्या प्रकल्पांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. तिच्या अभिनयाची समीक्षकांकडूनही प्रशंसा होत असून, तिचा आत्मविश्वास आणि परिपक्वतेने साकारलेले पात्र तिच्या नव्या पर्वाची झलक दाखवतात. अलीकडेच ती ‘क्रिमिनल जस्टिस’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या सिझनमध्ये झळकली, ज्यामुळे तिच्या पुनरागमनाला नवी उंची मिळाली आहे.


बालकलाकार ते विवादित व्यक्तिमत्व आणि आता एक परिपक्व, स्थिर अभिनेत्री, असा श्वेता बसु प्रसादचा प्रवास म्हणजे संघर्ष, पुनरुत्थान आणि आत्मविश्वासाची जिद्द याचं जिवंत उदाहरण आहे. तिने दाखवून दिलं की, वादाने आयुष्य संपत नाही. निर्धार आणि प्रतिभा असेल तर नवं यश नक्की मिळतं.


Post a Comment

0 Comments