Type Here to Get Search Results !

गावाचा विकास बोलणाऱ्यांनी आधी हमीपत्र द्यावं!

* नगरदेवळा गावात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर नाना महाजनांचा जोरदार टोला 

नगरदेवळा / प्रतिनिधी :- आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच गावाच्या सरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा गावात निवडणुकीचे वारे जोरदार धरू लागले आहेत. प्रत्येक गल्लीत उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू असून, तोंडी आश्वासनांचा पाऊस पडत आहे. इच्छुकांकडून तिकीटासाठी चांगलीच फिल्डींग लावली जात आहे. अनेकांनी उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली आहे, अशा वेळी कृषीतज्ज्ञ नामदेव विश्राम (नाना) महाजन यांनी गावातील सर्व इच्छुकांना थेट आणि सडेतोड संदेश दिला आहे की, गावाचा विकास बोलायचा असेल तर आधी गावकऱ्यांना हमीपत्र द्या!


नाना महाजन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जो कोणी गावाचा रस्ता करेल, पाणीपुरवठा सुरळीत ठेवेल, शेतपाण्यासाठी शेती रस्ते दुरुस्त करेल...त्यांनी आधी गावकऱ्यांना लिखित हमीपत्र द्यावं! मग तो सरपंच असो, पंचायत समिती सदस्य असो वा जिल्हा परिषद सदस्य असो. गावाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे.


ते पुढे म्हणाले की, पाच वर्षांनी निवडणुकीच्या तोंडावर विकासाचे गोड बोलणे थांबवावे. ज्यांना गावाच्या रस्त्यांची, पाण्याची, शेतशिवाराची काळजी नाही, त्यांना पुन्हा संधी देऊ नका. अन्यथा ‘ये रे माझ्या मागल्या’ हीच गत गावाची होईल.


नगरदेवळा गावात सध्या निवडणुकीचे तापमान चांगलेच वाढले आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पार्टी या सर्व पक्षातील इच्छुक तिकीटासाठी संघर्ष करीत आहेत.


गावातील अनेक अनुभवी तसेच तरुण नेतेही आता पुढे येत असून, मतदारांशी संवाद साधत आहेत. मात्र गावकऱ्यांमध्ये एकच सूर ऐकू येतोय आमचे रस्ते, पाणी, शेती आणि शाळा व्यवस्थित चालवेल असा उमेदवार हवा ; फक्त भाषणे नकोत, कृती हवी!


गावकऱ्यांचा रोख स्पष्ट आहे. अनेक नागरिकांनी मतदारसंघात जाहीर चर्चा करताना सांगितले की, पाच वर्षांनी फक्त चेहेरे बदलतात, पण गावाचे चित्र तसेच राहते. आता गावासाठी प्रामाणिक काम करणारा उमेदवार हवा.


नाना महाजन यांच्या वक्तव्याने ही भावना आणखी तीव्र झाली असून, स्थानिक पातळीवर या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्ष ‘विकासा’चा नारा देत असला, तरी महाजनांच्या “हमीपत्र” संकल्पनेने आता सर्व इच्छुक उमेदवारांवर दबाव वाढवला आहे. गावकऱ्यांनी थेट मागणी केली आहे की, प्रत्येक उमेदवाराने गावासमोर जाहीर करावे की तो निवडून आल्यावर काय करणार.


नाना महाजन यांच्या या ठाम भूमिकेमुळे नगरदेवळा गावातील निवडणूक केवळ राजकीय न राहता “विकास विरुद्ध आश्वासन” अशी ठरण्याची शक्यता आहे. गावकऱ्यांचा आवाज आता बुलंद झाला आहे. गावाच्या रस्त्याला, पाण्याला आणि शेताला न्याय देणारच उमेदवार हवा-बाकी सगळे बोलबच्चन हवेत उडाले पाहिजेत.


Post a Comment

0 Comments