* तरुण नेतृत्वाचा जलवा ; भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीच्या चर्चेला उधाण !
खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात तरुण नेतृत्वाची नवी लाट उसळली आहे. शहरातील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांमध्ये लोकप्रिय असलेले विक्रम साबळे यांनी नगर परिषद निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवल्यानंतर, खोपोली शहरात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
* विक्रम साबळे - तरुणाईचा विश्वास, मतदारांचा आवाज :- विक्रम साबळे हे गेल्या काही वर्षांपासून खोपोलीतील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे, संवादक्षमतेमुळे आणि संघटनशक्तीमुळे ते तरुण मतदारांच्या पसंतीस उतरलेले व्यक्तिमत्त्व आहेत. विक्रम साबळे यांनी शहरातील अनेक सामाजिक संस्था, युवक संघटना आणि क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून लोकांशी थेट नाते निर्माण केले आहे.
* भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीची चर्चा :- खोपोली शहरात सध्या भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी विक्रम साबळे यांचे नाव अग्रस्थानी असल्याची चर्चा रंगत आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा त्यांना ठाम पाठिंबा असल्याने साबळे यांच्या एन्ट्रीमुळे विरोधकांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षात नवसंजीवनी येईल, अशी अपेक्षा अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
* सामाजिक बांधिलकी आणि विकासदृष्टी - विक्रम साबळे फाउंडेशनची कामगिरी :- विक्रम साबळे हे ‘विक्रम साबळे फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक असून, त्यांच्या माध्यमातून अनेक विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी उपक्रम राबवले गेले आहेत. महिलांच्या सन्मानार्थ “मंगळागौर पारंपरिक लोकनृत्य स्पर्धा २०२५” चे यशस्वी आयोजन गणेशोत्सव सजावट स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजजागृती अभियान, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप, खेळाडूंसाठी ‘काशी स्पोर्ट्स सेंटर’ ची स्थापना या सर्व कार्यांमुळे विक्रम साबळे हे केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक नेतृत्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जात आहेत.
* खोपोलीत ‘तरुण विरुद्ध पारंपरिक नेतृत्व’ असा सामना :- भाजपाने जर खरंच विक्रम साबळे यांच्यावर नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, तर या निवडणुकीत तरुण नेतृत्व विरुद्ध अनुभवी नेते असा राजकीय सामना रंगणार, हे निश्चित. शहरात सध्या “विक्रम साबळे फॉर खोपोली” हा घोषवाक्याचा जलवा सोशल मीडियावर झळकत आहे.
खोपोलीसारख्या वाढत्या शहराला विकासदृष्टी आणि आधुनिक विचारांची गरज आहे. अशा वेळी विक्रम साबळे यांसारखे तरुण, शिक्षित आणि उद्यमशील नेतृत्व पुढे येणे ही शहरासाठी सकारात्मक बाब आहे. भाजपाने जर त्यांना संधी दिली, तर ही निवडणूक युवा नेतृत्वाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकते.
Post a Comment
0 Comments