* 108 क्रमांकाची रुग्णवाहिका तब्बल सहा तास उशिरा
* जखमींचे हाल - निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
* सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांच्या हस्तक्षेपामुळे अखेर रुग्णवाहिका पोहोचली ; प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह
कर्जत / नरेश जाधव :- कर्जत तालुक्यातील सालपे आदिवासीवाडी येथील अनंता लक्ष्मण वाघमारे (35 वर्षे) आणि सांगवी आदिवासीवाडी येथील गोरखनाथ काळुराम पवार (25 वर्षे) या दोघांचा 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास दुचाकी अपघात झाला. शिरसे–आकुर्ले मार्गावर समोरून आलेल्या दुसऱ्या दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे दाखल करण्यात आले. कर्तव्यावर असलेले डॉं. मोरे यांनी तातडीने प्रथमोपचार केले. मात्र, जखमींच्या डोक्याला आणि हातापायांना गंभीर दुखापत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.
* 108 क्रमांकाची रुग्णवाहिका - सहा तासांचा मृत्यूशी सामना :- संध्याकाळी पावणे सात वाजता डॉं. मोरे यांनी स्वतः 108 रुग्णवाहिका सेवेला फोन करून अपघातग्रस्तांची माहिती दिली. मात्र, त्यानंतर सुरु झाली प्रतीक्षेची अखंड शृंखला. रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, गाडीचा टायर पंक्चर आहे, गाडी खराब झाली आहे, गाडी खोपोलीला आहे, आता नेरळला आहे...अशी कारणे देत वेळ घालवली. अखेरीस रात्री 12 वाजेपर्यंत रुग्णवाहिका आलीच नाही. सहा तास उपचाराविना तडफडणाऱ्या अपघातग्रस्तांना पाहून नातेवाईक अस्वस्थ झाले.
* सामाजिक कार्यकर्त्याचा हस्तक्षेप - अखेर मदतीला रुग्णवाहिका :- दरम्यान, एका नातेवाईकाने साप्ताहिक ‘रायगडचे वादळ’चे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांच्याशी संपर्क साधला. गंगावणे यांनी घटना कळताच पाच मिनिटांत रुग्णालयात धाव घेतली आणि 108 सेवेकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली. तक्रार झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचली, आणि दोन्ही अपघातग्रस्तांना उल्हासनगर येथे हलविण्यात आले.
* प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप :- या घटनेमुळे आदिवासी भागातील नागरिकांमध्ये आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे. जर गंगावणे यांनी हस्तक्षेप केला नसता, तर या दुर्लक्षामुळे अपघातग्रस्तांचे जीव धोक्यात आले असते, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
प्रभाकर गंगावणे यांनी सांगितले की, ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. 108 सेवेमधील निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जातो. मी याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रार केली असून, सर्व रुग्णवाहिकांची तपासणी करून वेळेवर सेवा मिळावी यासाठी पुढील पातळीवर पाठपुरावा करणार आहे.
108 क्रमांकाची सेवा ही जनतेसाठी जीवनरेखा आहे, मात्र कर्जतमध्ये या सेवेच्या निष्काळजीपणामुळे जीव धोक्यात आला आहे. अपघातग्रस्त आदिवासी बांधवांना तासन्तास उपचाराविना सोडल्याने जबाबदार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक सामाजिक संघटनांकडून होत आहे.
Post a Comment
0 Comments