रायगड / दिनकर भुजबळ :- नवी मुंबई येथील ‘महिला विकास प्रतिष्ठान फाम (रजि.)’ या सामाजिक संस्थेच्या वतीने, तसेच खालापूर तालुक्यातील अग्रगण्य पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दिनकर भुजबळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या दिपावलीच्या पार्श्वभूमीवर एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला.
‘दीपावली आनंदोत्सव’ या विशेष कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील दुर्गम तळाशी असलेल्या गावांच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेट आणि फळांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम 14 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडला.
या सामाजिक उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेने दिलेले भावनिक आवाहन 'तुमच्या सहकार्याने उजळेल एक दिवा मनामनात’. या संदेशातून समाजातील दानशूर व्यक्तींना संवेदनशीलतेचे आवाहन करीत, संस्थेने गरजू कुटुंबांना थंडीत उब देणारी ब्लँकेट्स आणि पौष्टिक फळे देऊन दिवाळीचा आनंद त्यांच्या आयुष्यात पोहोचविण्याचा एक सुंदर प्रयत्न केला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. अध्यक्षा सत्वशीला जगन्नाथ नलवडे, सचिव वंदना आनंद साळवी, खजिनदार कुंजली सुरेश पवार यांनी समन्वय साधून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
‘महिला विकास प्रतिष्ठान फाम (रजि.), नवी मुंबई’ ही संस्था दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवते. या दीपावली आनंदोत्सवामुळे दुर्गम भागातील बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, हीच या कार्याची खरी सार्थकता ठरली.
यावेळी शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील, ग्रामविकास अधिकारी अंकुश पाटील, सदस्य स्वप्नील जाधव, ग्रामस्थ दत्तात्रय झोरे, गंगाराम झोरे, श्वेता जाधव, तसेच पत्रकार हणमंत मोरे साहेब उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक हणमंत गाडे सर, शिक्षक संदीप जाधव सर आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा ‘दीपावली आनंदोत्सव’ म्हणजे फक्त दिव्यांचा उत्सव नव्हे, तर मानवतेच्या प्रकाशाचा प्रसार करणाराभावनिक सोहळा ठरला.
Post a Comment
0 Comments