“मसुरकर संपलेत!”
“त्यांच्या काळात भ्रष्टाचार झाला!”
“खोपोलीचा विकास थांबला!”
अशा गप्पा टपऱ्यांवर, कार्यालयांत आणि राजकीय बैठकीत सध्या जोरात रंगल्या आहेत. पण या चर्चांच्या धुरात एक गोष्ट स्पष्ट दिसते. ती म्हणजे खोपोलीतील राजकारण त्यांच्याभोवती फिरते आणि मसुरकर अजून ‘गेममध्ये’ आहेत आणि त्यांची चाल अजूनही खोपोलीच्या राजकारणाची दिशा ठरवू शकते.
खोपोली नगर परिषदेच्या राजकारणात अनेक नावे आली-गेली, पण दत्तात्रेय मसुरकर यांचे नाव आजही “नियंत्रक” म्हणून घेतले जाते. माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी शहरात विकासाच्या अनेक योजना राबविल्या, पण त्यांच्याविरोधात आरोपांचे वादळ उठले. तरीही मसुरकर संपलेत असे म्हणणे म्हणजे खोपोलीच्या राजकीय नाडीचा गैरसमज होईल.
सत्ता त्यांच्या हातात नसली तरी राजकीय समीकरणांवर त्यांची बोटे अजून ठेवलेली आहेत. कोण उमेदवार उभा राहील, कोण माघार घेईल, कोण कुणाला साथ देईल, या सगळ्या गोष्टींवर मसुरकर यांचा अप्रत्यक्ष प्रभाव कायम असल्याचे जाणकार सांगतात.
* पक्षाशी नव्हे, तर परिस्थितीशी निष्ठा :- खोपोलीच्या गल्लीपासून मंत्रालयाच्या कॉरिडॉरपर्यंत एकच चर्चा “मसुरकर भाजपात जाणार का?”
राजकीय वर्तुळातल्या या कुजबुजीने वातावरण चैतन्यमय केले आहे. भाजपला नवसंजीवनी देण्याची ताकद मसुरकर यांच्यात आहे, असे स्वतः भाजपातील काही कार्यकर्ते सांगतात. त्यांच्या राजकीय हालचालींनी विरोधकही सज्ज झाले आहेत.
सत्ता कोणाची असो, मसुरकर यांची “संपर्कसाखळी” मात्र सर्व पक्षांत पसरलेली आहे. ते पक्षाशी नव्हे तर परिस्थितीशी निष्ठा राखतात, असे खोपोलीतील एक जुने नगरसेवक सांगतात. हाच गुण त्यांना ‘किंगमेकर’ बनवतो.
* नगराध्यक्ष कोण ठरणार ? मसुरकर ठरवतील ? :- आगामी नगर परिषद निवडणूक 2025 ही केवळ उमेदवारांची लढत नाही, तर प्रभाव आणि परंपरेची कसोटी ठरणार आहे. खोपोलीच्या राजकारणात अशी धारणा निर्माण झाली आहे की, “नगराध्यक्ष कोण होणार, हे ठरवणे मसुरकर यांच्याशिवाय शक्य नाही.” त्यांच्या संकेतावरच काही प्रभागात उमेदवार उभे राहतात, काही माघार घेतात. काहींचा प्रचार तेजीत जातो, काहींचा थंडावतो. हेच कारण की, त्यांच्याविरोधकांनाही त्यांचा राग येतो, पण आदरही वाटतो.
* शहराच्या विकासात अडथळा की अनुभवाचा फायदा ? :- मसुरकर म्हणतात “सत्ताधारी पक्षाशी जुळत नसल्यास निधी मिळत नाही.” ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. कारण राज्य आणि केंद्रात ज्या पक्षाचे सरकार असते, त्याच्याशी नगराध्यक्षाचे नाते ठरवते निधीचे भवितव्य. म्हणूनच त्यांच्या विधानाने सत्ताधाऱ्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. मसुरकर यांचा हा अनुभव बोलतोय की रणनीती, हे काळच ठरवेल.
* राजकीय समीकरणांचे केंद्रबिंदू :- आज खोपोलीतील राजकारणात मसुरकर हे ‘नाव’ नाही, तर ‘घटना’ आहे. त्यांच्याशिवाय चर्चा पूर्ण होत नाही, आणि त्यांच्यासह चर्चा शांत होत नाही. म्हणूनच, विरोधकांच्या टीका आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा यांच्या मधोमध उभे राहूनही मसुरकर राजकीय केंद्रबिंदू ठरले आहेत. 2025 च्या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष कोण होईल, हे अनिश्चित असले तरी “निर्णयामागे मसुरकर असतील,” हा अंदाज मात्र निश्चित आहे.
खोपोलीत राजकारण हे फक्त प्रचाराचे नव्हे, तर परस्परावलंबित्वाचे खेळ आहे. आज सत्ताधारी पक्ष विकासाच्या नावाखाली निधी खेचत असताना, विरोधकांतून काही “जुन्या खेळाडूं”च्या हालचाली सुरू आहेत. मसुरकर हे त्याच पिढीचे प्रतिनिधित्व करतात, जिथे राजकारण हे पदावर नव्हे, तर प्रभावावर उभे असते आणि तो प्रभाव अजूनही टिकलेला आहे.
खोपोलीत मसुरकर संपलेत म्हणणे म्हणजे इतिहासाचा धडा विसरणे होईल. ते अजूनही ‘किंगमेकर’ आहेत आणि निवडणूक 2025 त्याची साक्ष देईल.
- फिरोज पिंजारी (संपादक - दै. कोकण प्रदेश न्यूज)
Post a Comment
0 Comments