Type Here to Get Search Results !

दिघी येथे पोषण महिना उत्साहात

* अदानी फाउंडेशन आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पाचा उपक्रम

मुरूड / राजीव नेवासेकर :- अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड आणि एकात्मिक बालविकास सेवायोजन प्रकल्प (श्रीवर्धन) यांच्या संयुक्त विद्यमाने दिघी ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच विपुल गोरीवले यांच्या अध्यक्षतेखाली पोषण महिना निमित्ताने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

  

या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पोषण आहार (थाळी) स्पर्धा, ओटी भरणी कार्यक्रम, बेबी केअर किट वाटप, अन्नप्राशन कार्यक्रम घेण्यात आले.

   

या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिला, बालक आणि कुटुंबांमध्ये संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देणे हा होता. महिलांनी उत्साहाने पोषण थाळी स्पर्धेत सहभाग घेतला, विविध पालेभाज्या, कडधान्ये, भरडधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थ वापरून आरोग्यदायी थाळ्या सादर केल्या.

  

सदर कार्यक्रमात गर्भवती व नवमातांना ओटी भरणी कार्यक्रम व बेबी केअर किट देऊन सन्मानित करण्यात आले तसेच लहान बालकांसाठी अन्नप्राशन सोहळ्याचे आयोजन करून पालकांना योग्य आहारविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोषण आहार थाळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून “संतुलित आहार, निरोगी जीवन” हा संदेश सर्वत्र पोहोचविण्यात आला.

  

यावेळी ग्रामपंचायत सरपंच विपुल गोरीवले, उपसरपंच गोपाळ मेदाडकर, सदस्या निर्मला कांदेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकी मेंदडकर, एकात्मिक बालविकास सेवायोजन प्रकल्प श्रीवर्धन अधिकारी अमिषा भायदे, अदानी फाऊंडेशन अधिकारी अवधूत पाटील तसेच सर्व CRP आणि अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, महिला, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि बालके मोठ्या संख्येने उपस्थित होती.

  

ग्रामपंचायत सरपंच विपुल गोरीवले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पोषण आहार कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करुन संतुलित पोषण थाळी कशी असावी याविषयी मार्गदर्शन केले आणि अदानी फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

   

शासन राबवित असलेला पोषण आहार कार्यक्रम, अंगणवाडीमार्फत मिळणाऱ्या विविध लाभांची माहिती अधिकारी अमिषा भायदे यांनी दिली तर अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती अवधूत पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांना दिली. सूत्रसंचालन अमृता पिळणकर यांनी प्रभावीपणे केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसखी नम्रता दिघीकर व अरुंधती पिळणकर, सर्व अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत दिघी यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments