* सरपंच प्रमिला बोराडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कर्जत / प्रतिनिधी :- अभिनव ज्ञानमंदिर संस्था, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, कर्जत-रायगड येथील राज्यशास्त्र विभागात “ग्रामीण विकासामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरपंच प्रमिला सुरेश बोराडे (ग्रामपंचायत हालिवली) यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रमिला बोराडे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, एक आदर्श सरपंच म्हणून माझी ओळख निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे जोपासलेली नीतीमूल्ये, विचारधारा आणि लोकांप्रती असलेली निष्ठा हीच माझ्या यशामागील खरी कारणे आहेत.
त्या पुढे म्हणाल्या की, एखादी गोष्ट प्रत्यक्षात घडवायची असेल, तर तिचा विचार आधी मनात पेरावा लागतो. विचार पेरला की कृती उगवते, कृती पेरली की सवय बनते आणि सवय पेरली की चारित्र्य उगवते. म्हणूनच विचारांची शुद्धता हीच विकासाची पहिली पायरी आहे.
बोराडे यांनी आपला वैयक्तिक अनुभव सांगताना छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या आदर्श व्यक्तिमत्वांपासून घेतलेली प्रेरणा विद्यार्थ्यांसमोर मांडली.
माझ्या आईने नम्रतेचे, तर वडिलांनी स्वाभिमानाचे संस्कार दिले. लहानपणापासून वाचन आणि प्रवचन ऐकण्याची सवय जडली, आणि मी जे वाचले ते जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. हेच माझ्या प्रामाणिक आणि पारदर्शक कामकाजाचे रहस्य आहे, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, फक्त मार्कांच्या मागे धावू नका, तर गुणवान आणि ज्ञानी बना. कारण गुणी व्यक्तीला यश आपोआप मिळते. जीवनात ज्ञान, संस्कार आणि नीतिमूल्ये हीच खरी संपत्ती आहे.
‘ग्रामपंचायतीचा सहभाग’ या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, पूर्वी गावातील पंच चावडीवर बसून न्यायनिवाडा करत असत. स्वातंत्र्यानंतर लोकशाही व्यवस्थेतून ग्रामपंचायतींचा जन्म झाला. लोकांनी, लोकांकरिता आणि लोकांमधून निवडलेल्या प्रतिनिधींचे संघटन म्हणजे ग्रामपंचायत. त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया, उमेदवारांच्या अटी-शर्ती, मासिक सभा, ग्रामसभा, निर्णयप्रक्रिया, निधीचा वापर, 15 वा वित्त आयोग, सरपंच व ग्रामसेवक यांची जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती दिली.
बोराडे म्हणाल्या की, ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या विकासाचे केंद्र. पण आज काही ठिकाणी ‘माझी गाडी, माझी माडी, माझ्याच बायकोला साडी’ असा स्वार्थी विचार दिसतो. म्हणूनच 75 वर्षांनंतरही अनेक गावे आदर्श बनू शकली नाहीत. भ्रष्ट प्रशासन आणि पैशांच्या मोहात पडलेले मतदार हेच विकासाच्या आड येतात.
त्यांनी स्पष्ट सांगितले की, जर गावातील सरपंच आणि ग्रामसेवक प्रामाणिक असतील आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभले, तर केवळ पाच ते दहा वर्षांत गावाचा संपूर्ण कायापालट होऊ शकतो.
त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, जेव्हा एखादा सरपंच गावाला आपले मानतो आणि गावाच्या विकासासाठी झपाटतो, तेव्हा गावकऱ्यांचा त्याच्यावरचा विश्वासच त्याच्या ताकदीचे मूळ असतो. गावाचा विकास फक्त निधीने होत नाही, तो विश्वास, सहकार्य आणि प्रामाणिकतेने होतो.
व्याख्यानाच्या शेवटी त्या म्हणाल्या की, सरपंच होणे म्हणजे फक्त पाच वर्षांची योजना बनवणे नाही, तर पुढील पंधरा-वीस वर्षांचा दूरदृष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. गावातील पुढील पिढ्यांसाठी स्थायी विकासाचा आराखडा असावा, हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे.
सत्रादरम्यान बोराडे यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन ग्रामविकासाबाबतची समज अधिक दृढ केली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments