* सॅम अल्टमन यांची वादग्रस्त घोषणा : प्रौढ वापरकर्त्यांना ‘इरोटिका’ तयार करण्याची परवानगी
* मानसोपचार तज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांकडून तीव्र विरोध
मुंबई / प्रतिनिधी :- कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आता मानवी जगाच्या प्रत्येक क्षेत्रात पोहोचली असताना, तिने आता श्रृंगार आणि पोर्नोग्राफीच्या जगातही प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे. ओपनएआय (OpenAI) या कंपनीचा लोकप्रिय चॅटबॉट ‘चॅटजीपीटी’ आता प्रौढ वापरकर्त्यांना ‘इरोटिका’ म्हणजेच कामुक सामग्री तयार करण्याची परवानगी देणार असल्याची घोषणा कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी केली आहे. या निर्णयानंतर संपूर्ण जगभरात चर्चा, टीका आणि चिंतेची लाट उसळली आहे.
सॅम अल्टमन यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रौढ वापरकर्त्यांशी प्रौढांसारखे संवाद साधता यावेत, यासाठी चॅटजीपीटीवर इरोटिक सामग्री तयार करण्याची सुविधा दिली जाणार आहे. या फिचरसाठी वयाची खातरजमा (Age Verification) अनिवार्य ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या सुविधेमुळे चॅटजीपीटीमध्ये ‘पोर्नोग्राफिक कंटेंट’ निर्माण होण्याचा मार्ग खुला झाला आहे आणि याच कारणामुळे या निर्णयावर जगभरात विरोधाची लाट उसळली आहे.
अत्यंत विरोधाभासाची बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच सॅम अल्टमन यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की, चॅटजीपीटीवर कधीही सेक्सबॉट किंवा अश्लील सामग्री येणार नाही. मात्र, आता त्याच अल्टमन यांनीच या धोरणात बदल करत ‘एआय इरोटिका’चा मार्ग मोकळा केला आहे. कंपनीच्या निर्णयामुळे प्रौढ वापरकर्त्यांना ‘वय तपासणी’नंतर अशा प्रकारची सामग्री तयार करता येईल, परंतु तज्ज्ञांच्या मते ही अट फारशी परिणामकारक ठरणार नाही. कारण ऑनलाईन जगात वयाची मर्यादेला सहजपणे बगल देता येते आणि त्यामुळे अल्पवयीन मुलांनाही अशा फिचरचा प्रवेश मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
एलन मस्क यांच्या मालकीच्या ‘ग्रोक एआय’ या चॅटबॉटने काही दिवसांपूर्वी प्रौढांसाठी श्रृंगारीक ‘कंपॅनिअन चॅटबॉट्स’ सादर केले होते. त्याच पार्श्वभूमीवर ओपनएआयने घेतलेला हा निर्णय केवळ योगायोग नसून स्पर्धेचा भाग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ग्रोकवर पोर्न सामग्री उपलब्ध झाल्यानंतर ओपनएआय मागे राहू नये, या दबावातूनच हा निर्णय घेतला गेला असावा, असा अंदाज तंत्रज्ञान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, यामुळे जगभरात नैतिक, मानसिक आणि कायदेशीर परिणामांचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मानसोपचार तज्ज्ञांनी या नव्या फिचरवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, एखादं यंत्र कधीच मानवी भावना, प्रेम किंवा संबंधांची गुंतागुंत अचूकपणे समजू शकत नाही. एआयवर तयार होणारे पोर्न मानवी ‘फँटसी’ नष्ट करू शकतात आणि मानसिक विकृती वाढवू शकतात. त्यांनी इशारा दिला आहे की, या फिचरमुळे प्रौढ वापरकर्ते विकृत स्वरूपातील एआय पोर्नचा आनंद घेताना मानसिकदृष्ट्या गुंतागुंत निर्माण होऊ शकते, आणि अल्पवयीन मुलांमध्ये असामाजिक वर्तनाची शक्यता वाढेल. याशिवाय, एआय तंत्रज्ञानात आधीच वर्णभेद आणि पक्षपात आढळून येत असल्याने, एआय पोर्नमध्येदेखील अशा पूर्वग्रहांचा भयानक प्रभाव दिसू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या फिचरमुळे जगभरातील कायद्यांसमोरही नवे प्रश्न निर्माण होणार आहेत. अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये ‘एआय पोर्न’शी संबंधित सक्षम कायदे अद्याप अस्तित्वात नाहीत. त्यामुळे अशा सामग्रीचा गैरवापर, बालकांपर्यंत पोहोच आणि ऑनलाइन गुन्हे वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वीच एका १६ वर्षीय मुलाने चॅटजीपीटीवरील संभाषणानंतर आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर संबंधित पालकांनी ओपनएआयविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यामुळे नव्या फिचरनंतर अशाच प्रकारच्या मानसिक आणि सामाजिक दुर्घटना वाढण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
* एआय पोर्न : डिजिटल युगातील नवा वाद :- तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह एआय आता मानवी नैतिकतेच्या सीमांना आव्हान देत आहे. चॅटजीपीटीसारख्या जागतिक पातळीवर लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर पोर्न फिचर येणे ही केवळ व्यावसायिक रणनीती नसून, मानवाच्या भावनिक, सामाजिक आणि मानसिक मूल्यांवर थेट परिणाम करणारी घटना आहे. या निर्णयानंतर जगभरातील सरकारे, कायदे तज्ञ आणि सामाजिक संस्थांकडून कडक नियमन व नियंत्रणाची मागणी होत आहे.
तंत्रज्ञान वाढतंय, पण त्याला मानवी संवेदनेची दिशा देणे ही आता काळाची गरज आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. चॅटजीपीटीवर ‘पोर्न’ फिचर येणं हे केवळ डिजिटल जगातील नवं पाऊल नाही, तर मानव आणि यंत्र यांच्यातील नैतिक सीमांचे धूसर होणे याची सुरुवात आहे. सॅम अल्टमन यांच्या या निर्णयामुळे जगभरात तंत्रज्ञान, नैतिकता आणि कायदा या तीन पातळ्यांवर मोठा वाद पेटला आहे. तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आणि समाजाचं संतुलन या दोन टोकांमध्ये जग आता एका नव्या संघर्षाच्या उंबरठ्यावर उभं आहे.
Post a Comment
0 Comments