* शिवसेना शिंदे गटाचा पुढाकार : पाच लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीसाठी नगर परिषदेकडे निवेदन
* वाढत्या लोकसंख्येमुळे टंचाईचा प्रश्न तीव्र ; आ. थोरवे यांच्या 54 कोटींच्या जलयोजनेतून टाकीची मागणी
कर्जत / नरेश जाधव :- कर्जत शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. विशेषतः भिसेगाव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, नागरिकांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पाच लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्याची मागणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.
* वाढते कर्जत, घटते पाणी - शहराच्या विकासाबरोबर वाढतोय तुटवडा :- मागील काही वर्षांत कर्जत शहराची झपाट्याने प्रगती होत आहे. नवीन कर्जत–पनवेल रेल्वे मार्ग, आणि लवकरच सुरू होणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही प्रकल्पांमुळे कर्जतचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गृहसंकुल, टॉवर आणि रेसिडेन्शियल प्रकल्प उभे राहू लागले आहेत. लोकसंख्येच्या या झपाट्याने वाढलेल्या प्रमाणामुळे पाणीपुरवठ्याची मागणी अनेक पटीने वाढली, आणि विद्यमान योजनेची क्षमता अपुरी पडत आहे.
* महेंद्र थोरवे यांचा 54 कोटींचा जलप्रकल्प :- या वाढत्या मागणीचा विचार करून आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत शहरासाठी 54 कोटी रुपयांची नवी जलयोजना मंजूर करून आणली आहे. या योजनेअंतर्गत प्राथमिक स्तरावर कामाला सुरुवातही झाली आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून भिसेगाव परिसरात दोन लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, स्थानिकांचा दावा आहे की, या भागातील लोकसंख्या आणि प्रकल्पांच्या संख्येच्या मानाने दोन लाख लिटरची टाकी अत्यंत अपुरी ठरणार आहे.
* दोन लाख नव्हे, पाच लाख लिटर टाकी हवी - युवासेनेची ठाम मागणी :- भिसेगाव परिसरात राधे गॅलेक्सी, आर्यन टॉवर यांसारखी मोठमोठी संकुले आहेत. तसेच आगामी काळात आणखी अनेक टोलेजंग प्रकल्प उभारले जाणार असल्याने या भागातील पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. हे लक्षात घेता शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे शहर प्रमुख अमोघ कुळकर्णी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना पाच लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, भिसेगाव परिसरातील सध्याची पाणी योजना अपुरी आहे. भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि प्रकल्पांच्या गरजा लक्षात घेऊन वाढीव टाकीची उभारणी आवश्यक आहे, अन्यथा या भागातील नागरिकांना गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.
* भिसेगावमधील इतर समस्या देखील चर्चेत :- पाण्याबरोबरच भिसेगाव परिसरात अनेक स्थानिक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. त्यात विशेषतः सटवी आई मंदिर परिसरात तीन नवीन विद्युत पोल उभारण्याची मागणी, तसेच कचऱ्याचे नियोजन, ड्रेनेजची अडचण आणि रस्त्यांवरील अंधाराचा प्रश्न या मुद्द्यांवरही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
अधिकारी चव्हाण यांनी या सर्व मागण्या ऐकून घेत. भिसेगाव परिसरातील समस्या योग्यरीत्या हाताळल्या जातील. नगर परिषद तातडीने उपाययोजना करेल, असे आश्वासन दिले आहे.
या निवेदनावेळी कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, युवासेना शहर प्रमुख पश्चिम अमोघ कुळकर्णी, शहर युवा प्रमुख पूर्व सचिन भोईर, शहर उपप्रमुख मोहन भोईर, दिनेश कडू, प्रसाद डेरवणकर, सुदेश देवघरे, अनंता जूनघरे, विकास लाड, सचिन खंडागळे, संजय जाधव, तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments