Type Here to Get Search Results !

बुद्धविहार समाजमंदिर प्रकरणावर भारतीय बौद्ध महासभेचा पंचायत समितीस तीव्र निषेध


* बुद्धमूर्ती अंधारात, पंखे काढले बौद्ध, समाज नाराज

दापोली / रामदास धो. गमरे :- दापोली तालुक्यातील भोमाडी (बुद्धवाडी) येथील बुद्धविहार समाजमंदिराच्या संदर्भात ग्रामपंचायत निर्मल भोमाडी यांच्याकडून अन्यायकारक वर्तन झाल्याचा आरोप भारतीय बौद्ध महासभा शाखा क्र. २१ भोमाडी यांच्यातर्फे करण्यात आला असून, याविरोधात पंचायत समिती विरुद्ध तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.


भारतीय बौद्ध महासभेने दिलेल्या निवेदनानुसार संस्थेने दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी पंचायत समिती दापोलीच्या ग्रामपंचायत विभागाला पत्र पाठवून वर्षावास कार्यक्रम (धम्मदेसना) घेण्यासाठी बुद्धविहार समाजमंदिर वापरण्याची परवानगी मागितली होती. सदर निवेदनाचा विचार करून पंचायत समिती दापोली यांनी २४ सप्टेंबर २०२५ रोजी रीतसर परिपत्रक काढून निर्मल ग्रामपंचायत भोमाडी यांना समाजमंदिर विनाशुल्क खुलं करून देण्याचे आदेश दिले होते. सदर आदेश देताना ग्रामसेवक, प्रशासक अधिकारी, भारतीय बौद्ध महासभा दापोली शाखेचे पदाधिकारी, भोमाडी शाखेचे प्रतिनिधी तसेच गटविकास अधिकारी हे सर्व उपस्थित होते, परंतु ग्रामपंचायतीने पंचायत समितीचा आदेश धुडकावून लावल्याचा आरोप भारतीय बौद्ध महासभेने केला आहे.


भारतीय बौद्ध महासभेच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजेच २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी कार्यक्रम सुरू होण्याच्या दोन तास आधीच समाज मंदिराची चावी देण्यात आली तसेच समाजमंदिरातील वीजपुरवठा बंद करून पंखे काढण्यात आले, भिंतीवरील महापुरुषांचे फोटो उतरविण्यात आले आणि बुद्धमूर्ती अंधारात ठेवण्यात आली असा गंभीर आरोप भारतीय बौद्ध महासभेने केला आहे. विशेष नोंदणी घेण्यासारखे म्हणजे सदर प्रसंगानंतर अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसऱ्याच्या निमित्ताने त्याच समाजमंदिरात लाईट व पंखे पुन्हा लावून गरबा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभा दापोली तालुका शाखा व शाखा क्र. २१ भोमाडी यांच्यातर्फे शासन, पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायतीविरुद्ध तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. भारतीय बौद्ध महासभेने प्रशासनाकडे या प्रकरणाचा सखोल तपास करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments