Type Here to Get Search Results !

‘द नेचर’ प्रकल्पावर धार्मिक भावनांचा भंग केल्याचा आरोप!


* अनमोल डेव्हलपर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

* भैरवनाथ ट्रस्टकडून एनओसी (NOC) रद्द करण्याची मागणी

कर्जत / राजेंद्र जाधव :- कर्जत तालुक्यातील वांजळे येथील अनमोल डेव्हलपर्स यांच्या “द नेचर” या गृहनिर्माण प्रकल्पावर गंभीर आरोप होत असून, या प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या धार्मिक स्थळाची पवित्रता भंगली जात असल्याचा आरोप भैरवनाथ ग्रामदैवत ट्रस्टतर्फे करण्यात आला आहे. संबंधित बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची एनओसी (NOC) रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.


* तक्रार अर्ज गटविकास अधिकाऱ्याकडे दाखल :- भैरवनाथ ग्रामदैवत ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप ठाकरे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत यांच्याकडे औपचारिक तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जात नमूद करण्यात आले आहे की, “द नेचर” या गृहप्रकल्पातील सांडपाणी, गटारातील दूषित आणि अशुद्ध पाणी भैरवनाथ महाराज मंदिर परिसरातील मालकीच्या जागेत सोडले जात असून त्यामुळे मंदिर परिसर नापाक आणि अपवित्र होत आहे. या प्रकरणामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि भक्तांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. ट्रस्टकडून करण्यात आलेल्या तक्रारीत बिल्डरने नियम व अटींचे उल्लंघन केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.


* जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा संदर्भ :- या तक्रारीसोबत मा. जिल्हाधिकारी रायगड, अलिबाग यांनी १६ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेल्या आदेशाचा उल्लेख करण्यात आला आहे. आदेश क्रमांक म.शा./एल.एन.ए.१(व)/राजेंद्र जाधव/तक्रार अर्ज क्र.०२/२०२४ नुसार, वांजळे गावातील सर्वे क्रमांक ४/अ/१, ४/अ/२, ४/अ/३ आणि ४/अ/४ या जमिनींसंदर्भात सांडपाणी निचरा व्यवस्थेबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, ग्रामपंचायत किरवली यांनी गावठाणातील घरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करावी असे नमूद आहे. मात्र, ट्रस्टकडून असा आरोप करण्यात आला आहे की या आदेशाचे पालन झालेले नाही.


* तहसीलदार कार्यालयाने दिले पुढील निर्देश :- तहसीलदार कर्जत कार्यालयाने या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून शासनाचे विद्यमान कायदे, नियम आणि धोरणांनुसार आवश्यक ती चौकशी व कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, कार्यवाहीचा अहवाल अर्जदाराला देऊन त्याची प्रत तहसीलदार कार्यालयास पाठविण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.


* धार्मिक भावनांचा प्रश्न तीव्र :- ग्रामदैवताशी संबंधित स्थळावर अशुद्ध पाणी सोडल्याने स्थानिक भाविकवर्गात तीव्र भावना व्यक्त होत आहेत. ट्रस्ट सदस्यांनी या प्रकरणात धार्मिक अपमान झाल्याचे सांगत प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर, अनमोल डेव्हलपर्सविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा एन. ए. परवाना व एनओसी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.


आता हे प्रकरण गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीच्या स्तरावर तपासाधीन असून, पुढील काही दिवसांत याबाबत प्रशासनिक निर्णय अपेक्षित आहे. ग्रामस्थांच्या धार्मिक भावना आणि बिल्डरच्या प्रकल्प विकासामधील संतुलन राखणे ही स्थानिक प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments