Type Here to Get Search Results !

महाशक्तीपीठ, कंठवली येथे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 व्या शहीदी सोहळा पूर्व बैठक व नियोजन कार्यशाळा

* देशभरातील 10 राज्यांतून सुमारे 200 प्रमुख साधुसंतांची उपस्थिती लाभणार

मुंबई / प्रतिनिधी :- महाशक्तीपीठ तीर्थक्षेत्र कंठवली येथे ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम भव्य सोहळ्याच्या नियोजनासाठी पूर्व बैठक व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. हा भव्य समारंभ 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता महाशक्तीपीठ कंठवली, विंधणे, नवी मुंबई येथे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

   

कार्यक्रमाचे आयोजन हिंद-दी-चादर 350 वी शहिदी समागम समिती, समस्त शीख, बंजारा, लभाणा, सिकलीगर, मोहियाल व सिंधी समाज तसेच महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विभाग व हिंद दी चादर गुरु तेगबहादूर साहिब जी शहिदी समागम राज्यस्तरीय समिती, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

   

पूर्व बैठक व नियोजन कार्यशाळेचा मुख्य उद्देश धार्मिक स्वातंत्र्य, सत्य आणि मानवी हक्कांसाठी गुरु साहिबांनी केलेल्या अद्वितीय बलिदानाचा सन्मान करणे आणि त्यांच्या शिकवणीचा प्रचार करणे हा आहे. तसेच, लखीशाह बंजारा आणि मक्खनशाह लभाणा यांनी आपल्या गुरुबद्दल दाखविलेला आदर व ऐतिहासिक योगदान याचे स्मरण करणे व समाजातील गुरुबंधुत्व अधिक दृढ करणे ही या कार्यशाळेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

   

पूर्व बैठक व नियोजन कार्यशाळेतील उपस्थित मान्यवरांमध्ये गोर धर्मपीठाचे पीठाधिश्वर धर्मगुरू बाबुसिंग महाराज, शरदराव ढोले, रामेश्वर नाईक, धर्मरक्षक किसन राठोड, महेंद्र रायचूरा, महंत कबीरदास महाराज, सिद्धलिंग महास्वामी, महंत नंद गोपाल महाराज, विलास राठोड आणि भिकन जाधव आदी प्रतिष्ठित मान्यवरांसह देशभरातील विविध 10 राज्यांतून सुमारे 200 प्रमुख साधुसंत उपस्थित राहणार आहेत. 

  

ऐतिहासिक नोंदी व पुराव्यांच्या आधारे, भारतीय गोरबंजारा, लभाणा आणि शीख समाज, सिकलीगर, मोहियाल व सिंधी समाजाचा गौरवशाली इतिहास त्याग, बलिदान, शौर्य आणि पराक्रमाने नटलेला आहे. मानवतेसाठी स्वतःच्या प्राणांचा त्याग करणारे गुरु तेग बहादूर साहिब जी भारताच्या इतिहासातील सर्वोच्च शहीद मानले जातात. मध्ययुगीन भारतात धार्मिक स्वातंत्र्य आणि सत्यासाठी त्यांनी केलेले बलिदान आजही अजरामर आहे.

   

वक्त्यांच्या शहादतीच्या प्रसंगात बाबा लखीशाह बंजारा यांचे योगदान अतुलनीय आहे. गुरु साहिबांचे पार्थिव त्यांनी निर्भयतेने उचलून अंत्यसंस्कार केले, ज्यामुळे गुरुभक्ती, निष्ठा व त्यागाचे अमर उदाहरण इतिहासात कोरले गेले.

   

धर्मरक्षक किसन राठोड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ‘हिंद की चादर’ गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शहीदी समारंभ सोहळ्यास सहा समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या सोहळ्यामुळे गुरुबंधुत्व दृढ होईल आणि धर्म, श्रद्धा व त्यागाचा गौरव पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल.

Post a Comment

0 Comments