* शिळफाटा - शास्त्रीनगर खोपोली मार्ग ठप्प
* कुलकर्णी हॉस्पिटलला पोहोचण्यात तासभर उशीर
* 'आप' पक्षाकडून पोलिसांकडे चौकशीची मागणी
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरात राजकीय मिरवणुकीमुळे झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे एका रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. हार्ट अटॅक आलेल्या रुग्णाला शास्त्रीनगर येथील कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मिरवणुकीमुळे रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
* रस्ता पूर्णपणे ठप्प - गर्दीतून वाट मिळाली नाही :- शिळफाटा ते शास्त्रीनगर हा मुख्य मार्ग मिरवणुकीमुळे पूर्ण ठप्प झाला होता. स्थानिक इच्छुक नेत्यांच्या मिरवणुकीत ढोल-ताशे, फेटे, मोठी वाहन रांग आणि समर्थकांच्या गर्दीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. रूग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी निघालेल्या मोटारीला सुमारे एक तास वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागले. गर्दीत कोणीही बाजूला हटून रुग्णाला वाट देण्यास तयार नसल्याची तक्रार नातेवाईकांनी नोंदवली आहे.
* वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू :- अखेर मोठ्या प्रयत्नांनी रुग्णाला कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉंक्टरांनी सांगितले. योग्य वेळी उपचार मिळाले असते तर जीव वाचला असता, असेही कुटुंबीयांनी नमूद केले.
* ही कसली मिरवणूक ? लोकांच्या जीवाशी खेळू नका - नागरिकांचा संताप :- या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकांचे वाढते प्रमाण आणि अनियंत्रित गर्दीमुळे सार्वजनिक जीवन विस्कळीत होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नेत्यांचे शक्ती प्रदर्शन आणि ढोल-ताश्यांच्या मिरवणुकीपेक्षा एका निरपराध माणसाचा जीव अधिक मौल्यवान आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
* आम आदमी पार्टीकडून पोलिसांकडे चौकशीची मागणी :- या घटनेवर आम आदमी पार्टी खोपोलीने वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे निवेदन सादर करून सदर मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रदेश संघटन मंत्री डॉ. रियाज पठाण आणि शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजकीय मिरवणुकीमुळे एका रुग्णाला शिळफाटा येथून खोपोली शास्त्री नगर येथील कुलकर्णी रुग्णालयात पोहोचण्याकरीता मिरवणुकीमुळे झालेल्या ट्रॅफिक जाममुळे उशीर झाला व सदर रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशी माहिती प्राप्त झालेली आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदर माहिती सत्य असल्यास आचारसंहितेच्या काळामध्ये अशा प्रकारे मिरवणूक काढणाऱ्या आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच अशा घटनांना रोखण्यासाठी पोलिसांनी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत.
* मिरवणुका रस्त्याच्या एका बाजूनेच :- दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देतांना एका समाजकर्मीने सांगितले की, भविष्यात कोणतीही मिरवणूक रस्ता पूर्णपणे अडवून न काढता ती एका बाजूने काढण्यास पोलिसांनी बंधनकारक करावे. आज एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. उद्या कुणाच्यातरी आई-वडिलांचा, मुलाचा जीव धोक्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, घटनेची प्राथमिक माहिती पोलिसांकडे पोहोचली असून तपास सुरू असल्याचे समजते. मृत्यूचे कारण मिरवणुकीमुळे झालेल्या उशीराशी संबंधित आहे की नाही याचा तपशीलवार तपास करण्यात येणार आहे. या प्रकरणी संबंधित मिरवणूक आयोजकांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments