Type Here to Get Search Results !

सत्यशोधक समाजाच्यावतीने भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

* धरती आबा बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिनाचे औचित्य

नांदेड / प्रतिनिधी :- सत्यशोधक समाज नांदेडच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त काबरा नगर, बिरसा मुंडा चौक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष दत्ता तुमवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. धरती आबा, क्रांतीसूर्य, आणि आदिवासी जनतेचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

* जल, जंगल, जमीन चळवळीचे प्रतिक - बिरसा मुंडा यांचे स्मरण :- कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसटी मेकॅनिक आणि महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, 18 व्या शतकात इंग्रज शासन आणि सावकारशाहीने आदिवासी जनतेवर अन्याय करताना ‘जल, जंगल, जमीन’ या त्यांच्या वारशावर डाका टाकला. या अन्यायाविरुद्ध बिरसा मुंडा यांनी आदिवासी युवकांना एकत्र करून 1895 मध्ये ‘उलगुलान’ हा ऐतिहासिक उठाव उभारला व जमिनींचे हक्क परत मिळवून दिले.


त्यांनी पुढे सांगितले की, आजच्या काळात युवकांनी मोबाईलमध्ये गुंतून न राहता बिरसा मुंडा यांचा आदर्श अंगीकारावा आणि समाज व राष्ट्रहितासाठी काम करावे.


कार्यक्रमास विविध समाज संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यामध्ये सत्यशोधक समाज जिल्हाध्यक्ष दत्ता तुमवाड, एसटी महामंडळ माजी डेपो मॅनेजर तुकाराम टोम्पे, कवी बी.एन. मोरे, मोहन वाघमारे (बामसेफ), मन्नेरवारलू संघटना जिल्हाध्यक्ष दत्तात्रय अन्नमवाड, महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, आदिवासी कोळी महादेव समाजाचे माधव रेडेवाड, दादाराव कोठेवाड, चर्मकार महासंघ जिल्हाध्यक्ष गणपतराव वाघमारे, कॉं. बी.एन. घायाळे, बालाजी पाटोळे, गंगाधर अनपलवाड आदींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मोहन वाघमारे यांनी मानले.


भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या या कार्यक्रमास विविध समाजातील बांधव, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती कार्यक्रमात ऐतिहासिक स्मरण, प्रेरणादायी भाषणे आणि आदिवासी स्वाभिमानाचा जल्लोष पाहायला मिळाला.

Post a Comment

0 Comments