Type Here to Get Search Results !

सौदी अरेबियातील भिषण अपघातात 42 भारतीयांचा मृत्यू

* प्रवासी बसला डिझेल टँकरची धडक ; मृतांमध्ये हैदराबादच्या 20 महिला व 11 मुलांचा समावेश 

सौदी अरेबिया - हैदराबाद / विशेष प्रतिनिधी :- मक्केवरून मदीनाला जात असलेल्या भारतीय उमराह यात्रेकरूंच्या बसला सोमवारी भीषण अपघात झाला. डिझेल टँकरला धडक दिल्यानंतर बसला आग लागली आणि यात 42 भारतीयांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 20 महिला आणि 11 मुले असल्याचे प्राथमिक अहवालात सांगण्यात आले आहे. मृतांपैकी बहुतांश जण हैदराबादचे रहिवासी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

* डिझेल टँकरची धडक आणि बसला लागलेली आग :- माहितीनुसार, आज पहाटे भारतीय वेळेनुसार 1:30 वाजता, मदीनापासून सुमारे 160 किमी अंतरावर असलेल्या मुहरास परिसरात हा अपघात झाला. बसने डिझेल टँकरला जोरदार धडक दिली आणि काही सेकंदांतच संपूर्ण बस पेटली. अनेक प्रवासी झोपेत असल्याने धडक आणि अचानक लागलेली आग यामुळे त्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.


* सर्व मृत भारतीय :- सौदी माध्यमांनुसार, बसमधील सर्वजण भारतीय उमराह यात्रेकरू होते. ते मक्काहमधून धार्मिक विधी संपवून मदीनाकडे निघाले होते.


* तेलंगणा सरकार सतर्क - भारतीय दूतावासाशी सतत संपर्क :- तेलंगणा सरकारने या घटनेवर तात्काळ प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिल्लीतील राज्य प्रतिनिधींना भारतीय दूतावासाशी सतत संपर्क ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे.

📞 79979-59754, 99129-19545


* भारतीय दूतावासाची 24 × 7 हेल्पलाइन सक्रिय :- जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष उभारला आहे.

📞 इंडियन एम्बसी हेल्पलाइन : 8002440003

दूतावासाने प्रवाशांची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे आणि कुटुंबीयांना तत्काळ संपर्क करण्याचे आश्वासन दिले आहे.


* असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया :- हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी हस्तक्षेप करून मृतदेह भारतात आणावेत आणि जखमींना योग्य उपचार मिळावेत. ओवैसी यांनी हैदराबादमधील दोन ट्रॅव्हल एजन्सींशी आणि रियाधमधील भारतीय दूतावासाशी सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले.


* उमरा म्हणजे काय ? :- उमरा वर्षभर कधीही करता येतो. ही अनिवार्य यात्रा नसून मक्का - मदिना येथे केली जाणारी संक्षिप्त धार्मिक यात्रा आहे. मुस्लिम धर्मीय आयुष्यात अनेक वेळा उमरा करू शकतात.


ही दुर्घटना गेल्या काही वर्षांतील सौदी अरेबियातील सर्वात भीषण बस अपघातांपैकी एक ठरली आहे. भारतीय सरकार आणि सौदी प्रशासन मिळून मृतांची ओळख पटविणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे सुरू केले आहे.



Post a Comment

0 Comments