* पहिल्या मृत्यूचा तपास सुरू असतानाच पुन्हा दुसरा मृतदेह
* नातेवाइकांचा घातपाताचा संशय ; कासोदा - भडगाव महामार्गावर रास्ता रोको
भडगाव / प्रतिनिधी :- तालुक्यातील पिंपरखेड येथे तलावात आणखी एक मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याच तलावात दोन दिवसांपूर्वी (14 नोव्हेंबर) वाल्मीक संजय ह्याळींगे (वय 27) या तरुणाचा मृतदेह सापडला होता. त्या घटनेचा तपास सुरू असतानाच पुन्हा एक मृतदेह मिळाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
* दुसरा मृतदेह सकाळी 7 वाजता आढळला :- 16 नोव्हेंबर रोजी सकाळी नारायण रामदास ह्याळींगे (वय 52) यांचा मृतदेह त्याच तलावात तरंगताना दिसला. दोन दिवसांच्या आत सलग दोन मृतदेह मिळणे हा साधा योगायोग नसून गंभीर प्रकार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व नातेवाईकांमध्ये उमटली आहे. पहिल्या घटनेची अकस्मात मृत्यू (ADR) म्हणून नोंद झाली होती. मात्र, नव्या मृत्यूने संशयाचे धुके अधिक दाटले आहे.
* हा घातपात आहे, आरोपींना अटक करा :- मृतकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठा आक्रोश व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट मागणी केली की, या मृत्यूंबाबत घातपाताचा संशय आहे. आरोपींना तात्काळ अटक करावी, इन कॅमेरा पोस्टमार्टम करावे, या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत कासोदा - भडगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यामुळे वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली आणि पोलिस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
* वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव :- घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी तातडीने दाखल झाले. अप्पर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी (पाचोरा) बापू रोहम , स्थानिक गुन्हे शाखा पीआय राहुल गायकवाड, भडगाव पोलिस स्टेशन पीआय महेश शर्मा, पीएसआय सुशिल सोनवणे, लक्ष्मी करनकाळ, शेखर डोमाळे आदी अधिकाऱ्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून तपास लवकर पूर्ण करण्याचे व आवश्यक कारवाईचे आश्वासन दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आला.
* दोन्ही मृत्यूंबाबत घातपाताचा संशय :- सलग दोन मृतदेह मिळाल्याने गावात तर्कवितर्क सुरू असून दोघांनाही कुणीतरी मारले असण्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. निवासींची एकमुखाने मागणी आहे की, पोलिसांनी तातडीने सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा करावी.
* तपास सुरू :- भडगाव पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात दोन्ही मृत्यूंचा परस्पर संबंध आहे का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments