* पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
* 10 दिवसांत सेवा सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार - अरविंद गायकर
मुरूड / राजीव नेवासेकर :- मुरुड शहरात जवळपास वर्षभरापासून आधार सेवा बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आधार सेवा तात्काळ सुरू करावी, या मागणीसाठी पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी जिल्हाधिकारी (रायगड) यांना निवेदन दिले. या निवेदनात दहा दिवसांत सेवा पुन्हा सुरू न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन नायब तहसीलदार संजय तवर यांनी स्विकारले.
* आधार सेवा बंद, नागरिकांची मोठी गैरसोय :- निवेदनात म्हटले आहे की, मुरुड शहरातील नागरिक जवळपास वर्षभर आधार सेवेशिवाय आहेत. आज शासकीय - निमशासकीय कोणत्याही कामासाठी आधार कार्ड आवश्यक असताना ही सेवा बंद असल्याने नागरिकांना लाडकी बहिण, संजय गांधी निराधार योजना, शिष्यवृत्ती योजना, पेन्शन लाभार्थी, शेतकरी योजना (PM किसान), महिला कल्याण योजना या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे शेकडो नागरिकांना रोहा किंवा अलिबाग येथे धाव घ्यावी लागत असून नाहक त्रास व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
* 2013 पासून सुरू असलेले केंद्र अचानक बंद :- सन 2013 पासून उदय सबनीस यांनी मुरुड येथे आधार केंद्र सुरू केले होते. त्यांच्या माध्यमातून महा ई- सेवा केंद्र, शासकीय योजनांची माहिती, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, पेन्शन, शेतकरी योजना, पीएम (PM) किसान लाभार्थी नोंदणी अशी अनेक कामे नागरिकांना सहजपणे उपलब्ध होती. 2021 मध्ये त्यांना तहसील कार्यालयातील खोलीही उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, काही महिन्यांपासून त्यांच्या आधार नोंदणी सेवा अचानक बंद झाल्याने नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे.
* पोस्ट ऑफिस व बँक ऑफ इंडिया येथील सेवा तात्काळ सुरू करा :- निवेदनात नमूद मागणी करण्यात आली आहे की, पोस्ट ऑफिस व बँक ऑफ इंडिया येथील आधार सेवा तात्काळ सुरू करावी. पात्र लाभार्थ्यांना आधार केंद्र सुरू करण्यासाठी परवाना देण्यात यावा. पुढील 10 दिवसांत सेवा पुनःप्रारंभ न झाल्यास तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या निवेदनाच्या प्रती उपजिल्हाधिकारी रायगड, पोलिस अधीक्षक, तहसीलदार मुरुड, पोलिस निरीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Post a Comment
0 Comments