Type Here to Get Search Results !

बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

* नात्यातीलच मुलाकडून कुकर्म ; गावकऱ्यांनी चार दिवस उपचारासही रोखले

* आईवर गुन्हा दडपण्यासाठी ग्रामस्थांकडून दबाव

* पोलिस अधीक्षकांकडे तक्रार पोहोचल्यावर अखेर गुन्हा नोंद

बीड / प्रतिनिधी :- मालेगावच्या डोंगराळे गावातील तीन वर्षांच्या चिमुकलीवरील अमानुष अत्याचार, हत्येची घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अत्यंत संतापजनक प्रकरण उघड झाले आहे. साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर नात्यातीलच मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.


घटना 11 नोव्हेंबर रोजी घडली. मात्र, सर्वात वेदनादायी बाब म्हणजे पीडित मुलीला उपचारासाठी जाऊ न देण्यासाठी गावकऱ्यांनी तब्बल चार दिवस आईवर दबाव टाकला. बदनामी होऊ नये म्हणून गावात बैठका घेऊन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला.


* चार दिवस वेदना सहन करणारी चिमुरडी :- चार दिवसांपर्यंत मुलगी घरीच वेदनांनी तडफडत होती. गावातील काही लोकांनी, "गुन्हा नोंदवू नका, गावाची बदनामी होईल" असा दबाव आणल्यामुळे आईही मानसिकदृष्ट्या कोलमडली होती. मात्र, अखेर मुलीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी थेट पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शिरूर कासार पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदविला आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या चिमुरडीवर बीडच्या शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


* नात्यातील मुलाकडून कुकर्म - कुटुंबाला धमक्या :- प्राथमिक तपासात उघड झाले की अत्याचार नात्यातीलच एका नराधम मुलाने केला आहे. गावकऱ्यांनी बदनामी टाळण्यासाठी पीडित कुटुंबाला धमक्या दिल्या, गुन्हा दडपण्यासाठी विविध बैठकाही घेतल्या. आपली आपबीती सांगताना मुलीची आई अश्रूंनी कोसळली. गावातील भीती आणि दबावामुळे ती प्रचंड तणावाखाली होती.


* पोस्को अंतर्गत गुन्हा - पोलिसांच्या चौकशी मागणी :- बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी याप्रकरणावर कडक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, पोस्को अंतर्गत गुन्हा तात्काळ नोंद करणे बंधनकारक आहे. गुन्हा नोंद करण्यात झालेली दिरंगाई ही देखील गुन्हाच आहे. शिरूर कासार पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे.


ते पुढे म्हणाले की, 90 टक्के प्रकरणांत अशाच प्रकारे गावातील दबावामुळे पीडित कुटुंबाला पोलिस ठाण्यापर्यंतही पोहोचू दिले जात नाही. या प्रकरणात मात्र मुलीची आई हार न मानता गुन्हा नोंदवण्यासाठी ठाम राहिली.


* समाजाला हादरवणारी घटना :- या अमानुष प्रकरणाने बीड जिल्ह्यासह राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नात्यातील मुलाकडून झालेल्या अत्याचारामुळे आणि गावकऱ्यांनीच गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे समाजमानसाला मोठा धक्का बसला आहे. पीडित चिमुरडीच्या न्यायासाठी कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिस व प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments