* ठाण्यातील लॉजमध्ये महिलेसह लपला होता, बनावट नावाने देत होता चकवा
* सनी रमेश भोसले तीन दिवस वेशांतर करून पळ काढत होता
* साताऱ्यातून बुक केलेल्या कॅबने उघड झाला ठावठिकाणा
* दरबारातून तंत्र–मंत्र साहित्याचा मोठा साठा जप्त
कोल्हापूर / प्रतिनिधी :- टिंबर मार्केट परिसरात भूतबाधा दूर करण्याचे खोटे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक करणारा ‘चुटकीवाला भोंदूबाबा’ सनी रमेश भोसले अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तीन दिवस पोलिसांना चकवा देत बनावट नावाने व वेशांतर करून फिरणाऱ्या सनी भोसलेला ठाणे पश्चिमेतील एका लॉजवरून अटक करण्यात आली. त्याच्यासह एक महिला देखील सापडली असून ती स्वतःला त्याची पत्नी असल्याचा बनाव करीत होती.
* असा उघड झाला भोंदूबाबाचा ठावठिकाणा :- सनी भोसलेने मोबाईल फोन बंद करून पोलिसांना चक्रावून टाकले होते. मात्र, तपासादरम्यान तीन दिवसांपूर्वी साताऱ्यातून बुक केलेल्या कॅबचा क्रमांक त्याच्या मोबाईलवरील शेवटचा संपर्क असल्याचे समोर आले. कॅब चालकाला ताब्यात घेऊन सलग दोन दिवस चौकशी केल्यानंतर महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आणि भोंदूबाबा ठाण्यात असल्याचे निश्चित झाले. यानंतर पोलिसांनी ठाणे पश्चिम येथील एका भाड्याच्या फ्लॅट / लॉजवर छापा टाकत सनी भोसलेला पकडले.
* भूतबाधा काढण्याच्या नावाखाली 65 हजारांची मागणी :- सनी भोसलेविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात 12 नोव्हेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. गणेश विश्वास काटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भोसलेने त्यांच्या पत्नीवरील भूतबाधा उतरण्याचे सांगून 65 हजारांची मागणी केली होती. 45 हजार रुपये देऊनही काहीही न झाल्याने काटकर यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली.
* दरबारातून जप्त झाले तंत्र - मंत्र साहित्य :- कोल्हापुरातील विविध ठिकाणी पोलिसांनी सतत छापे टाकले, परंतु भोसले हाती लागत नव्हता. शेवटी पोलिसांनी फुलेवाडी रिंगरोडवरील क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील ‘दरबार’वर छापा मारला असता तंत्र–मंत्र विधीची पुस्तके, मृत प्राण्यांच्या कवट्या, काळ्या बाहुल्या, गंडा, कुंकू, ताईत, महिलांचे टाचण्या मारलेले फोटो, दारूच्या बाटल्या, विविध कागदपत्रे आदी साहित्य जप्त करण्यात आले. या सर्वातून भोसलेची फसवणूक व अंधश्रद्धा पसरविण्याची पद्धत उघड झाली.
* 5 दिवसांची पोलीस कोठडी :- ठाण्यावर छापा मारतांना भोसलेसोबत असलेली महिला स्वतःला त्याची पत्नी असल्याचा बहाणा करत होती. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन महिलेची कुटुंबाच्या इच्छेनुसार सुरक्षित सोय करण्यात आली. सनी भोसलेला न्यायालयात हजर केल्यानंतर 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
* फसवणूक झाल्यास तत्काळ संपर्क साधा :- कोल्हापुरात धार्मिक विश्वासाचा गैरफायदा घेऊन फसवणूक करणाऱ्यांचे प्रकार वाढत असल्याने करवीर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments