Type Here to Get Search Results !

नगरदेवळा - टाकळी रस्त्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी युवानेते मुन्ना भांडारकर यांचा पुढाकार

* वारंवार केलेल्या विनंत्यांनंतरही रस्त्याचे काम रखडले

* गावकऱ्यांच्या सहकार्याने खड्डे भरून शेतकऱ्यांना दिला दिलासा

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :-  नगरदेवळा - टाकळी या मुख्य मार्गांची अवस्था गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत खराब झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात नेणे, ट्रॉली व वाहनांची वाहतूक करणे अशक्यप्राय झाले होते. स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नव्हती.

* शेतकऱ्यांची अडचण ओळखून युवानेते मुन्नाभाऊंचा पुढाकार :- गंभीर होत चाललेल्या परिस्थितीची जाणीव होताच स्थानिक युवा नेते प्रणय भांडारकर (मुन्नाभाऊ) यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्याच्या समस्येला हात घातला. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची अडचण समजून घेतली. रस्त्याची दुरावस्था आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे देखील मांडण्यात आली तसेच तातडीने उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली.


* गावकऱ्यांच्या सहकार्याने तात्पुरता रस्ता तयार :- काम रखडत असल्याने अधिक प्रतीक्षा न करता मुन्नाभाऊंनी गावकऱ्यांच्या मदतीने खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून, रस्ता समतल करून वाहतुकीस तात्पुरता सुयोग्य बनविला. या स्वयंप्रेरित कामामुळे शेतमाल वाहतूक सुलभ झाली आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.


* शेतकऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त :- मुन्नाभाऊंच्या या तातडीच्या आणि लोकहिताच्या प्रयत्नांचे गावकरी व शेतकरी यांनी मनापासून कौतुक केले. शेतकरी हितासाठीची ही भूमिका आदर्श ठरावी, अशीही भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. नगरदेवळा - टाखळी रस्ता दुरुस्तीचा हा स्थानिक पातळीवरचा उपक्रम ग्रामीण एकजुटीचे आणि जनतेच्या समस्या सोडविण्याच्या सकारात्मक नेतृत्वाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

Post a Comment

0 Comments