Type Here to Get Search Results !

पाचोरा बसस्थानक विद्यार्थ्यांसाठी ठरते ‘संजिवनी’


* ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘लालपरी’चा सुरक्षित प्रवास आणि परवडणाऱ्या पासची मोठी मदत

पाचोरा / फिरोज पिंजारी :- पाचोरा शहरातील बसस्थानक ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी जणू संजिवनी ठरत आहे. शिक्षणासाठी तालुक्यातील विविध खेड्यांमधून दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पाचोऱ्यात दाखल होतात. काही विद्यार्थी पाचवीपासून, तर काही दहावी-बारावीनंतर किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. या सर्व विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहनची ‘लालपरी’ बस सेवा हा एक मोठा आधार आहे.


* विद्यार्थी पास - कमी खर्चात जास्त सुविधा :- विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करीत एसटी महामंडळाने मोठी सवलत दिली आहे. 20 दिवसांचे भाडे भरून 30 दिवस प्रवासाची परवानगी तर मुलींसाठी शासनाचा ‘फ्री पास’ (पूर्णपणे मोफत) या योजनेमुळे गरीब व अल्पभूधारक कुटुंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणातील अडचण मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.


* सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटी प्रवास सर्वात विश्वसनीय :- ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एसटी बस हा सुरक्षिततेचा उत्तम पर्याय मानला जातो. पाचोरा तालुक्यातील अनेक गावांमधून नियमित बसफेऱ्या उपलब्ध असून, यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचणे आणि घरी परतणे सोपे होते.


* कोणकोणत्या गावांमधून विद्यार्थी येतात ? :- नगरदेवळा, वडगांव, आखतवाडे, नेरी, बाळद, नाचणखेडे, लोहटार, अंतुर्ली, तारखेडा, गाळण, खडकदेवळा, बनोटी, सातगाव, सामनेर, बांबरूड, भडगांव, कुऱ्हाड, कासमपुरा, लोहारा, बिल्दी, लोहारी, पिंपळगाव हरे., वरखेडी, नांद्रा, आर्वे, शिंदाळ, वाडी शेवाळे आदी अनेक लहान-मोठ्या खेड्यांमधील विद्यार्थ्यांची शेकडोंने संख्या लालपरीवर अवलंबून आहे.


* शिक्षणास चालना देणारी महत्त्वाची सेवा :- एसटी बस सेवा आणि विद्यार्थी पास योजना यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणक्षमता वाढली आहे. तसेच पालकांचा आर्थिक भार हलका झाला आहे. सुरक्षित व वेळेवर प्रवासामुळे उपस्थिती सुधारली, मुलींच्या शिक्षणास मोफत पासमुळे विशेष प्रोत्साहन मिळत आहे. पाचोरा शहरातील बसस्थानक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला अक्षरशः ‘संजिवनी’ ठरत असून, लालपरीमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची पंखे लाभत आहेत.

Post a Comment

0 Comments