* जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तिन्ही जागांवर ‘मशाल’ घेऊन उतरण्याची तयारी ; नगरदेवळ्यातील युवा उमेदवाराचा दावा सर्वाधिक मजबूत
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा - बाळद जिल्हा परिषद गट तसेच नगरदेवळा पंचायत समिती गण व बाळद पंचायत समिती गण या तिन्ही जागांवर महाविकास आघाडी ताकदीने रिंगणात उतरणार असल्याचे सूत्रांकडून समजते. या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीच्या घटक दलांमध्ये प्राथमिक सहमती बनली असून उमेदवार निवडीचा अंतिम टप्पा सुरु आहे.
* नगरदेवळ्यातील उमेदवाराला प्राधान्य :- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या गटातील सर्वात मोठे गाव नगरदेवळा (12 ते 15 हजार मतदार) असल्यामुळे जिल्हा परिषद जागेसाठी उमेदवार नगरदेवळ्यातीलच असावा, असा जोरदार सूर स्थानिक पातळीवर उमटत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व काँग्रेस या तिन्ही पक्षांची युती या गटात एकत्रित शक्तीप्रदर्शनासाठी सज्ज झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
आघाडीकडून ही जागा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला देण्याची शक्यता असून उमेदवार ‘मशाल’ चिन्हावरून रिंगणात उतरेल अशी माहिती मिळत आहे. स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे की, युवा, अभ्यासू आणि संघटनात सक्रिय असलेल्या नगरदेवळ्यातील एका तरुणाला संधी देण्याची तयारी झाली आहे.
* शिंदे गट - भाजपातही हालचाल :- या गटातून प्रमुख दावेदार शिवसेना शिंदे गटाचे मनोहर गिरधर पाटील उर्फ रावसाहेब जिभू हे निपाणे गावाचे रहिवासी असून माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. तर भाजपाकडून युवा उद्योजक प्रणय उर्फ मुन्ना भांडारकर (नगरदेवळा), सरदार एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य किरण काटकर सर (नगरदेवळा) व पाचोरा - भडगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष रवींद्र पुंडलिक पाटील उर्फ रवी बाबा (पिंपरी) हे तीन उमेदवार आहेत. भाजपा कुणाला संधी देणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांत तीव्र अंतर्गत स्पर्धा असून अधिकृत उमेदवार कोण असेल याबाबत चर्चांना वेग आला आहे.
* महाविकास आघाडीची रणनीती :- सूत्रांच्या माहितीनुसार संपर्क प्रमुख सुनील पाटील, शिवसेना (उद्धव) तालुकाध्यक्ष, नगरदेवळा येथील पदाधिकारी हे उमेदवार अंतिम करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. याशिवाय राज्यस्तरीय प्रमुख नेते नगरदेवळा - बाळद गटात प्रचारासाठी येणार अशी दाट शक्यता असून आघाडीच्या प्रचारयंत्रणेने तयारीला सुरुवात केली आहे. नगरदेवळा गावात उमेदवार निवडीसंदर्भात चर्चा आणि फिल्डींग जोरात असून स्थानिक युवकांनी, “यंदा कर्तव्य आहे, बदल घडवायचाच” असा निर्धार व्यक्त करीत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
* विजयाची ‘मशाल’ पेटवण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज :- नगरदेवळा बाळद जिल्हा परिषद गट, नगरदेवळा पंचायत समिती गण व बाळद पंचायत समिती गण या तिन्ही जागा महाविकास आघाडी ताकदीने लढणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडी तिन्ही जागांवर मजबूत उमेदवार उभा करून भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांना कडवी टक्कर देण्याची तयारी करीत असल्याचे दिसत आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारीचा अधिकृत खुलासा होणार असून नगरदेवळा - बाळद गटाचे राजकीय चित्र प्रचंड रंगेल, यात संशय नाही.

Post a Comment
0 Comments