Type Here to Get Search Results !

युनिव्हर्सल ए. आय. युनिव्हर्सिटी प्रशासनाविरोधात कामगार व ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

* पानंद रस्ता बंद, नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलला, स्मशानभूमीची जागा हडप

* 80 कामगारांवर 17 वर्षे अन्याय - लढा उग्र झाल्यास जबाबदार प्रशासनच

* कुशिवली ग्रामस्थ आणि कामगारांचा संयुक्त आक्रोश - लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे नाही

कर्जत / नरेश जाधव :- कर्जत तालुक्यातील वदप ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे कुशिवली येथील युनिव्हर्सल ए. आय. युनिव्हर्सिटी प्रशासनाविरुद्ध आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. गेली 15 - 17 वर्षे या कॉलेजमध्ये कार्यरत सुमारे 80 कामगारांना मिळणारी हिन वागणूक, थकित वेतन, सुविधा अभाव आणि युनिव्हर्सिटी प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या जमिनी व पाण्यावरील अतिक्रमणासारख्या गंभीर तक्रारींमुळे कामगार व ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी कॉलेज गेटसमोर अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले आहे.

* 17 वर्षांची सेवा… तरीही कायमस्वरूपी दर्जा नाही ; वेतन, वैद्यकीय सुविधा, विमा याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ? :- कर्जत तालुक्यातील वदप ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे कुशिवली येथील असलेल्या युनिव्हर्सल ए.आय. युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गेली 15 ते 17  वर्षापासुन आजूबाजूचे खेडे गावातील महिला व पुरूष असे एकूण 80 कामगार हे इमानेइतबार सेवा देण्याचे काम करीत आहेत. 15 - 17  वर्षांच्या सेवेनंतरही कायमस्वरूपी कर्मचारी दर्जा नाही, वेतनवाढ न देता किमान वेतन कायदाही पाळला जात नाही, वैद्यकीय सुविधा, विमा सुरक्षा, पीएफ लाभ - सर्वच अपूर्ण, ओव्हरटाईमचे पूर्ण पैसे रोखले जातात, बोनस कायद्याप्रमाणे बोनस मिळत नाही, महिला कर्मचाऱ्यांना जेवणाची, विश्रांतीची योग्य सुविधा नाही. कामगारांच्या म्हणण्यानुसार, कॉलेज प्रशासन काम करून घेते, पण मूलभूत हक्क देण्याबाबत गंभीर नाही.


* ग्रामस्थांचे गंभीर आरोप - पानंद रस्ता बंद, पाण्याचा प्रवाह वळवला, स्मशानभूमीची जागा वापरली :- उपोषणात ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यांचा आरोप आहे की, पूर्वीचा पानंद रस्ता युनिव्हर्सिटीने अडवला, युनिव्हर्सिटीच्या 40 एकर परिसरात नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलला, जवळपास 90-100 एकर भातपिकाचे मोठे नुकसान होत आहे. आदिवासींची दीड एकर जमीन कब्जात असून वदप ग्रुप ग्रामपंचायतीची 4 गुंठे स्मशानभूमीची जागा देखील ए.आय. युनिव्हर्सिटीने हडप केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे प्रकार गावकऱ्यांच्या अस्तित्वावरच गदा आणणारे आहेत.


* रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार :- ग्रामस्थांच्या तक्रारींनुसार, युनिव्हर्सिटीतील काही विद्यार्थी - विद्यार्थिनी रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर सिगारेटसह इतर बेकायदेशीर कृत्ये करीत असल्याने गावाच्या संस्कृतीला बाधा पोहोचत आहे. ग्रामस्थांचा प्रश्न आहे की, कॉलेजच्या नावाखाली गावाची शांतता का बिघडवली जात आहे ? 


* उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या :- 

- (कामगारांसाठी) ✔ किमान वेतन कायद्यानुसार वेतन

✔ कायमस्वरूपी कामगार दर्जा

✔ सर्वांना पीएफ

✔ प्रलंबित वेतन त्वरित देणे

✔ वार्षिक वाढ व बोनस

✔ ओव्हरटाईमचे संपूर्ण मानधन

✔ जेवणासाठी स्वतंत्र व स्वच्छ जागा

✔ अपमानास्पद वागणूक थांबवणे

- (ग्रामस्थांसाठी) ✔ अडवलेला पानंद रस्ता तात्काळ खुला करणे

✔ नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्ववत करणे

✔ आदिवासी जमीन परत करणे

✔ स्मशानभूमीची हडपलेली जागा मोकळी करणे

✔ विद्यार्थ्यांकडून होणारे रात्रीचे गैरप्रकार थांबवणे


* ...तर आमचे उपोषण थांबणारही नाही :- या आंदोलनाचे नेतृत्व करणारे लिलाधर गायकवाड कुशिवली ग्रामस्थ म्हणाले की, जोपर्यंत कामगार - ग्रामस्थांच्या सर्व मागण्यांबाबत कॉलेज प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आमचे उपोषण सुरू राहील. जर परिस्थिती बिघडली किंवा कायदा - सुव्यवस्था ढासळली, तर 100% जबाबदार युनिव्हर्सल ए.आय. युनिव्हर्सिटी प्रशासनच असेल.


* संघर्ष उग्र होण्याची चिन्हे :- आमरण उपोषणाच्या पहिल्याच दिवशी कामगार, महिला कर्मचारी, आदिवासी ग्रामस्थ व युवकांची मोठी उपस्थिती पाहता हा संघर्ष मोठ्या आंदोलनात रूपांतरित होण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक प्रशासन या प्रकरणात कसे हस्तक्षेप करते, कॉलेज व्यवस्थापन संवाद साधते का ? आणि पुढील काही दिवसांत परिस्थिती कोणत्या दिशेने वळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, संध्याकाळी उशिरा मागण्या मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 


Post a Comment

0 Comments