* नैसर्गिक आपत्ती व अडचणी लक्षात घेऊन सरकारचा निर्णय
* e-KYC करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025
* मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोटाशी संबंधित कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचेही निर्देश
मुंबई / प्रतिनिधी :- 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्यभर मोठ्या प्रमाणावर आणि यशस्वीपणे राबवली जात असून, लाभार्थ्यांच्या सोयीसाठी राज्य सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. e-KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 ही पूर्वी जाहीर करण्यात आली होती, परंतु गेल्या काही दिवसांत राज्यभर झालेल्या नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक पात्र महिलांना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही.
या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने e-KYC ची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
* नवीन अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 :- राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखों पात्र महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
* मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र आवश्यक :- ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, किंवा घटस्फोट झालेले आहेत, त्यांनी स्वतःच्या e-KYC सोबत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयीन आदेशाची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
* मुदतवाढ दिली आहे, तरी प्रक्रिया लवकर पूर्ण करा :- राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, ही मुदतवाढ लाभार्थ्यांच्या सोयीसाठी दिली असून, योजनेचा लाभ अखंडितपणे मिळत राहण्यासाठी e-KYC लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.
* लाखो बहिणींना दिलासा देणारा निर्णय :- ही मुदतवाढ नैसर्गिक आपत्ती, कागदपत्र अभाव, तांत्रिक अडचणी या सर्व कारणांमुळे e-KYC पूर्ण न करू शकलेल्या महिलांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. राज्यातील सर्व लाभार्थींनी 31 डिसेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ कायम ठेवावा, असे आवाहन सरकारने केले आहे.

Post a Comment
0 Comments