Type Here to Get Search Results !

कर्जतमध्ये महायुतीचे शक्तीशाली प्रदर्शन!

* शिवसेना शिंदे - भाजप - आरपीआयचा दणदणीत शक्तिसागर ; नगराध्यक्षपदासाठी डॉं. स्वाती लाड मैदानात

* युतीचे दिग्गज नेते, विशाल रॅली आणि गगनभेदी घोषणा - कर्जतचा रणसंग्राम तापला!

कर्जत / नरेश जाधव :- कर्जत नगर परिषद निवडणुकीत आज महायुतीने ‘शक्ती प्रदर्शन म्हणजे नक्की कसे असते’ याचा थरारक प्रत्यय शहराला दिला. शिवसेना शिंदे गट, भाजप आणि आरपीआय या तिन्ही पक्षांनी एकत्रित दमदार ताकद दाखवत नगराध्यक्ष तसेच 21 प्रभागांसाठी संभाव्य उमेदवारांची विजयी मिरवणूक काढत कर्जतचे राजकीय वातावरण अक्षरशः दणाणून सोडले.

* धापया महाराजांच्या दर्शनाने प्रारंभ :- रॅलीची सुरुवात शहराचे ग्रामदैवत श्री धापया महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉं. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांना महायुतीच्या नेत्यांनी पुष्पहार अर्पण करीत विजय संकल्प व्यक्त केला. ढोल-ताशांचा कडकडाट, बॅनर - पोस्टरची रेलचेल, मोटारसायकली - जीप - कारांच्या लांबलचक फौजा आणि उत्साहात नाचणारे कार्यकर्ते असा अभूतपूर्व जल्लोष करीत रॅली अर्ज दाखल केंद्रावर दाखल झाली.


या शक्ती प्रदर्शनाने कर्जतच्या राजकीय नकाशावर युतीची पकड अधोरेखित केली आहे. याप्रसंगी महायुतीचे प्रमुख नेते आमदार प्रशांत ठाकूर, आमदार चित्रा वाघ, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, विधानसभा संपर्क प्रमुख किरण ठाकरे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, वसंत भोईर, अतुल बडगुजर, शरद लाड (माजी नगराध्यक्ष), राजेश लाड, रजनी गायकवाड, राहुल डाळिंबकर (माजी उपाध्यक्ष), दीपक बेहेरे, रमेश मुंढे, अरविंद मोरे, लालधारी पाल आदींची उपस्थिती महायुतीच्या अंतर्गत एकजूट आणि आत्मविश्वासाचे द्योतक ठरली.


* नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून ‘स्मार्ट फेस’ - डॉं. स्वाती अक्षय लाड :-  आजच्या शक्ती प्रदर्शनातील सर्वात मोठा ‘राजकीय ट्विस्ट’ म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी भाजपने डॉं. स्वाती अक्षय लाड यांच्या नावाची घोषणा केली व त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या उच्चशिक्षित, तल्लख, जनसामान्यांशी सहज संवाद साधणाऱ्या, माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुनबाई आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला राजकीय वजन आणि प्रादेशिक स्विकारार्हता दोन्ही मिळत आहे. भाजपने त्यांना ‘आश्वासक आणि विजयी चेहरा’ म्हणून ज्या पद्धतीने पुढे केले, त्यातून युतीचा आत्मविश्वास स्पष्ट दिसून आला.


* विरोधकांच्या शोला दिलेले प्रत्युत्तर :- अलीकडेच परिवर्तन विकास आघाडीने घेतलेल्या शक्ती प्रदर्शनाला महायुतीने आज दणक्यात उत्तर दिले. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, विरोधकांची ताकद पाहून नव्हे… तर युतीची खरी घनता दाखविण्यासाठी हे प्रदर्शन होते. आमदारांपासून ते छोटे–मोठे पदाधिकारी, अगदी कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी एकजुटीने सहभाग घेतल्याने "कर्जतमध्ये यावेळी महायुतीची हवा जोरात आहे,” अशी चर्चा शहरात रंगली आहे.


* कर्जतचा रणांगण रंगतदार :- नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण होताच कर्जतचा निवडणुकीचा पट फारच रोचक बनला आहे. काही प्रश्नांभोवती आता सगळे राजकारण गरम झाले आहे. परिवर्तन विकास आघाडीचे अंतिम पत्ते काय असतील ? महायुती शहरात कितपत वाढत आहे ? अल्पसंख्याक - दलित प्रभागांमध्ये कोण वरचढ ? स्विंग मतदार कोणाकडे झुकतात ? उशिरा अर्ज भरलेल्या उमेदवारांचे समीकरण काय ? कोणती नवी गठबंधने किंवा राजकीय धक्के समोर येतात ? सध्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे.


* कर्जत निवडणूक ‘हाय व्होल्टेज’ :- आजच्या महायुतीच्या दमदार शक्ती प्रदर्शनाने कर्जत नगर परिषदेचा राजकीय पट पूर्णपणे हलवून टाकला आहे. आगामी काही दिवसांत प्रचारयुद्ध, आरोप - प्रत्यारोप, सभांमधील गर्दी आणि घराघरातील तळागाळचा संपर्क या सर्वांचा मिलाफ कर्जतचा पुढील नगराध्यक्ष आणि सत्ताधारी गट ठरवणार आहे.



Post a Comment

0 Comments