Type Here to Get Search Results !

बिरसा मुंडा यांचे विचार वाडीतांड्यापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज - गुणवंत मिसलवाड

* नांदेड एसटी डेपो येथे आदिवासी गौरव दिन व बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

नांदेड / प्रतिनिधी :- जल, जंगल, जमीन ही आदिवासी जनतेची मूलभूत संपत्ती असून 18 व्या शतकात ब्रिटीश व सावकारशाहीने या जमातींवर अन्याय केला. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी उलगुलान आंदोलन उभारून जमिनींचे हक्क परत मिळवून देणारे महान क्रांतीकारक म्हणजे बिरसा मुंडा. त्यांचे विचार आणि कार्य वाडीतांड्यापर्यंत पोहोचले पाहिजे, हीच काळाची खरी गरज आहे, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक व महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगारात 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हारकळ यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली.


प्रमुख वक्ते म्हणून बोलताना गुणवंत मिसलवाड म्हणाले की, बिरसा मुंडा यांनी इंग्रजी दडपशाहीविरुद्ध आदिवासी जनतेला संघटित करून 1895 च्या ‘उलगुलान’ चळवळीतून निर्णायक लढा छेडला. त्यांनी आदिवासी जनतेला जमीन कास्त करण्याचा हक्क मिळवून दिला. आजच्या युवापिढीने मोबाईलमध्ये अडकून न राहता या इतिहासातून प्रेरणा घेणे अत्यावश्यक आहे.


त्यांनी पुढे युवकांना संदेश दिला की, धरती आबांचा आदर्श घेऊन समाज व देशासाठी कार्य केले पाहिजे. बिरसा मुंडा यांचा संघर्ष हा स्वाभिमान, हक्क आणि धैर्याचा धडा आहे.


कार्यक्रमास सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हारकळ, पाळी (शिफ्ट) प्रमुख कैलास वाघमारे, संजय खेडकर, पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वरिष्ठ लिपिक सुरेश फुलारी, नितीन मांजरमकर, आनंद कोटगीरे, वैशाली कोकणे, श्वेता तेलेवार, सुनिता हुंबे, यांत्रिक विभाग शेख अलीमोद्दीन कृष्णा पवार, संजय मंगनाळे तसेच एसटी आगारातील कष्टकरी कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या इतिहासाचे स्मरण आणि बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारक विचारांचा गौरव करण्यात आला.


Post a Comment

0 Comments