* खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 : निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण
खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शिस्तबद्धता राखण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाला आज अधिकृत सुरुवात झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खोपोली नगर परिषद निवडणूक कामकाजाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
खालापूर येथील लायन्स क्लब सभागृह, गुडलक चौक, जुन्या मुंबई-पुणे महामार्ग, खोपोली येथे आयोजित या प्रशिक्षण सत्राला निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी (कर्जत) प्रकाश संकपाळ, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार खालापूर अभय चव्हाण तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी पंकज पाटील हे उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून मतदान केंद्रांची जबाबदारी, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची हाताळणी, मतदान प्रक्रियेतील संवेदनशील मुद्दे, आचारसंहितेचे पालन, सुरक्षा उपाययोजना आणि दिव्यांग मतदारांसाठी करण्यात येणाऱ्या विशेष सुविधा याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित करतांना सांगितले की, मतदान दिनाच्या प्रत्येक टप्प्यात अचूकता, शिस्त आणि पारदर्शकता राखणे ही सर्वाधिक प्राथमिकता असून प्रत्येक मतदान कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व काटेकोरपणे पार पाडली पाहिजे.
या प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेतील सर्व संबंधित अधिकारी अधिक आत्मविश्वासाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने मतदानाची तयारी पूर्ण करू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 साठीचे हे प्रशिक्षण सत्र यशस्वी पार पडले असून, आगामी मतदान प्रक्रियेची सर्वांगीण तयारी अंतिम टप्प्यात आहे.

Post a Comment
0 Comments