* पातोंडा येथील हृदयद्रावक घटना ; नितीन बिरारी (36) यांचा दुर्दैवी मृत्यू
अमळनेर / प्रतिनिधी :- पातोंडा येथे शनिवारी घडलेल्या भीषण अपघातात गावातील तरुण शेतकरी नितीन सुरेश बिरारी (वय 36) यांचा थरारक परिस्थितीत मृत्यू झाला. नांद्री शिवारात मका काढणीचे काम सुरू असताना गळ्यातील रुमाल अचानक थ्रेशर मशीनच्या ब्लोअरमध्ये अडकला आणि काहीच क्षणात नितीन खाली कोसळला. उपस्थित कामगारांना काही कळायच्या आत ही गंभीर दुर्घटना घडली.
अपघातानंतर तातडीने त्याला अमळनेर येथील नर्मदा मेडिकल फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. घटना इतकी अचानक आणि गंभीर होती की लोकांना शुद्धीवर येण्यासाठी वेळ लागला.
ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत नितीनच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या अचानक जाण्याने बिरारी कुटुंब उघड्यावर पडले असून संपूर्ण पातोंडा गावात हळहळ आणि शोककळा पसरली आहे.
या दुर्दैवी घटनेने शेतीतील यांत्रिकीकरणासोबत सुरक्षा नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे.

Post a Comment
0 Comments