Type Here to Get Search Results !

सशस्त्र सेना ध्वज दिन : राष्ट्ररक्षक वीरांना कृतज्ञ अभिवादन!

* शौर्य, बलिदान आणि देशसेवेच्या पवित्र परंपरेला नमन ;  सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकाचा हातभार महत्त्वाचा

रायगड / प्रतिनिधी :- दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस राष्ट्रभर सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. 1949 पासून सुरू असलेली ही परंपरा आजही सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देते. सीमारेषेवर देशाच्या सन्मानासाठी उभे राहणाऱ्या शूर सैनिकांना, शहीद वीरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कृतज्ञतेचा हा दिवस समर्पित आहे.

* देशाच्या सन्मानासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्यांना सलाम :- सैनिक हे राष्ट्राचे सर्वात मोठे बळ, सामर्थ्य आणि अभिमान. आपल्या सुरक्षेसाठी, शांततेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी हे जवान दिवसरात्रं सीमेवर पहारा देतात, प्रतिकूल हवामान, अडथळे आणि आव्हानांचा सामना करतात आणि आवश्यक त्या क्षणी प्राणाची परवा न करता देशासाठी लढतात. मातृभूमीच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या शहीद वीरांप्रती राष्ट्र सदैव ऋणी आहे.


* सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान :- सैनिक जेव्हा सीमारेषेवर कर्तव्य बजावत असतात, तेव्हा त्यांच्या घरातील प्रत्येक जणही त्या त्यागाचा मूक भाग असतो. म्हणूनच जखमी सैनिक, युद्धात अपंग झालेले जवान, शहीदांच्या वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबियांना आदर, आधार, पुनर्वसन आणि आर्थिक मदत करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.


* देशवासियांचा सहभाग - ध्वज दिनाची खरी भावना :- सरकार विविध योजना राबवत असले तरी नागरिक म्हणून आपले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ध्वज दिनाच्या माध्यमातून आपण देशासाठी बलिदान देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी मदतीचा हात देतो, आणि सैनिकांसाठीच्या सेवाभावाला बळकटी आणतो.


सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणजे फक्त एक दिवस नाही तर देशाचे रक्षण करणाऱ्यांप्रती आपल्या कृतज्ञतेचे नित्य स्मरण आहे. या वीरांचे, त्यांच्या शौर्याचे, आणि त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाचे राष्ट्र सदैव ऋणी राहील.


Post a Comment

0 Comments