* सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिराला स्वच्छता गृह हस्तांतरण
* शाळा व ग्रामस्थांकडून ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक
खालापूर / अर्जुन कदम :- जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट, चौक यांच्या वतीने मुलींसाठी अत्याधुनिक, सुरक्षित आणि सुविधा संपन्न स्वच्छतागृह बांधून ते सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिर, चौक विद्यालयाला हस्तांतरित करण्यात आले. हा उपक्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्याम साळवी यांच्या हस्ते पार पडला.
* मुलींसाठी स्वतंत्र सुविधा :- जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट ही सामान्य नागरिकांना न्याय देणारी, जनकल्याणकारी उपक्रम राबविणारी प्रतिष्ठित संस्था आहे. विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात मुलींची मोठी संख्या असून उपलब्ध असलेले स्वच्छता गृह अपुरे होते. विशेषतः मुलींसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्याने शाळा व्यवस्थापनाने ट्रस्टकडे प्रस्ताव मांडला.
विषयाची गंभीरता लक्षात घेत अध्यक्ष श्याम साळवी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व पाच सिटचे अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारून देण्याचे आश्वासन पूर्ण केले. या स्वच्छतागृहात मुलींसाठी खास सुविधा बसविण्यात आल्या आहेत.
* लवकरच सॅनिटरी पॅड मशीन :- ट्रस्टचे अध्यक्ष श्याम साळवी यांनी मुलींच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने सॅनिटरी पॅड मशीन लवकरच उपलब्ध करून देण्याची घोषणा यावेळी केली. त्यांच्या या संवेदनशील आणि प्रगत दृष्टीकोनाचे शाळेतील शिक्षक व विद्यार्थिनींनी स्वागत केले.
* आपत्तीच्या काळातही मदतीसाठी धावणारी संस्था :- पावसाळ्यात झालेल्या वादळामुळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीवरील पत्रे उडून गेली होती. ही समस्या एक दिवसही न लांबवता ट्रस्टने त्वरित नवे पत्रे बसवून दिल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅंड. अविनाश देशमुख यांनी दिली.
कार्यक्रमात शाळेतील लहान विद्यार्थिनी कार्तिकी माळी हिने मनोगत व्यक्त करून ट्रस्टचे आभार मानले. विद्या प्रसारिणी संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्याम साळवी यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख, अॅंड. राजेंद्र मोरे, सचिन मते, प्रकाश जाधव, रामदास काईनकर, विष्णू खैर, विजय निरगुडा, प्रशांत खांडेकर, निखिल मालुसरे, राकेश कदम, समाधान दिसले, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थिनी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा छायाचित्रकार म्हणून अर्जुन कदम यांनी उपस्थित मान्यवरांसह स्वच्छतागृह हस्तांतरणाचे दस्तऐवजीकरण केले.
* विद्यार्थीनींच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल :- या अत्याधुनिक स्वच्छतागृहामुळे मुलींना स्वच्छता, गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे. शाळा व्यवस्थापन आणि पालकांनी ट्रस्टच्या या जनकल्याणकारी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

Post a Comment
0 Comments