* महिलांच्या शाश्वत उपजीविकेसाठी 'उमेद - एमएसआरएलएम’ व ‘राह फाउंडेशन’चा सामंजस्य करार
मुंबई / प्रतिनिधी :- राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना अर्थार्जनासाठी विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ग्रामविकास विभागांतर्गत उमेद अभियानांतर्गत काम सुरू आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांना आर्थिक सक्षमता व शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान (MSRLM) आणि राह फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार (MoU) निश्चितच व्यापक प्रमाणावर विस्तार करण्यास सहायक ठरेल , असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांना आर्थिक सक्षमता व शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उमेद, - महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान (MSRLM) आणि राह फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. प्रामुख्याने पालघर, नाशिक आणि रायगड या भागातील आदिवासी तसेच ग्रामीण महिलांसाठी त्यांच्या अंगभूत कौशल्याचा आणि स्थानिक संसाधनाचा वापर करून संधीचा विस्तार करण्यात येणार आहे. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी उमेदसह विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत. राह फाऊंडेशन सोबतच्या सामंजस्य कराराने या तीन जिल्ह्यांतील महिलांना तांत्रिक ज्ञान, अद्ययावत माहिती यांच्या सहाय्याने अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने भरीव प्रयत्न करण्यात येणार आहे.
* कराराचा उद्देश :- या कराराचा उद्देश पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यांतील महिलांना हवामान, स्मार्ट शेती, जलसुरक्षा आणि निसर्गाधारित उपजीविका उपक्रमांद्वारे सक्षम करणे आहे. राह फाउंडेशनचे तांत्रिक ज्ञान आणि उमेदच्या स्वयं-सहायता गटांचे (SHGs) विस्तृत जाळे यांचा समन्वय साधून ग्रामीण महिलांना साधन संपत्ती, प्रशिक्षण आणि बाजार पेठेतील संधी मिळतील.
* राबविण्यात येणारे उपक्रम :- या भागीदारीअंतर्गत तीनही जिल्ह्यांमध्ये दोन नर्सरी विकास व जैव-उत्पादन केंद्रे उभारली जाणार असून 5 हजारांहून अधिक महिला आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. तसेच महिलांच्या सहभागाने फूड फॉरेस्ट प्रकल्प उभारला जाणार आहे, ज्यातून प्रत्येक महिलेला वर्षाला 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमांतर्गत वन धन योजना, पीएमएफएमई, एनएचएम, आरसेटीआय यासारख्या विविध शासकीय योजनांशी एकत्रिकरण करून महिला शेतकऱ्यांना कर्ज, विमा, बाजारपेठ व प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
उमेद - एमएसआरएलएम आणि राह फाउंडेशनचे हे सहकार्य महाराष्ट्राच्या व्हिजन 2030, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) आणि राष्ट्रीय हवामान बांधिलकी (NDCs) यांच्याशी सुसंगत महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे आदर्श मॉडेल निर्माण करण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

Post a Comment
0 Comments