* नागरिकांच्या बैठकीत प्रशासनाचा निर्णय स्पष्ट
* नवीन कारवाईची प्रक्रिया लवकरच सुरू
* दोन दिवसांत अधिकृत जाहीर सूचना - तरीही पाच गावांतून सामाईक अर्ज सादर करण्याची नागरिकांची तयारी
खालापूर / केपी न्यूज ब्युरो :- 24 नोव्हेंबर 2025 रोजी नगर पंचायत खालापूर कार्यालयात आयोजित नागरिकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत घरपट्टी कर वाढीबाबत मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीस नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, तसेच स्विकृत नगरसेविका शिवानी जंगम व सुप्रिया साळुंखे आदी उपस्थित होते.
* घरपट्टी वाढीचा ठराव रद्द :- बैठकीत झालेल्या चर्चेनंतर खालापूर नगरपंचायतीने घरपट्टी कर वाढीचा ठराव अधिकृतपणे रद्द केल्याची माहिती प्रशासनाने दिली. यामुळे या वाढीव कराच्या विरोधात करावयाच्या हरकती / आक्षेप सादर करण्याची आवश्यकता आता उरलेली नाही, हेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
* नवीन प्रक्रिया नव्याने :- घरपट्टीसंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने बैठकीत स्पष्ट केले. यासाठी आवश्यक तयारी सुरू असून, विषयाची सर्वसमावेशक व पारदर्शक हाताळणी करण्याचा प्रयत्न असल्याची हमीही देण्यात आली.
* दोन दिवसांत जारी होणार अधिकृत जाहीर सूचना :- खालापूर नगर पंचायत लवकरच पुढील दोन दिवसांत या संदर्भातील अधिकृत अधिसूचना (जाहीर सूचना) प्रसिद्ध करणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्याची प्रक्रिया औपचारिक स्वरूपात सुरू होईल.
* पाच गावांतून सामाईक अर्ज दाखल करण्याची नागरिकांची भूमिका कायम :- घरपट्टी ठराव रद्द जरी झाला असला, तरी पाच गावांतील नागरिकांनी एकत्रित सामाईक अर्ज नगरपंचायतीकडे सादर करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. प्रत्येक गावातून नागरिकांच्या सहीसह अर्ज तयार करून तो प्रशासनास देण्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

Post a Comment
0 Comments