* आम आदमी पार्टीचे नगराध्यक्ष व 11 नगरसेवकांचे अर्ज दाखल
* भ्रष्टाचारमुक्त खोपोली, पारदर्शक प्रशासन आणि मूलभूत सुविधांच्या हक्कासाठी 'आप'ची लढाई
* खोपोलीचा चेहरा बदलवू, एक संधी द्या - डॉं. रियाज पठाण
खोपोली / केपी न्यूज ब्युरो :- खोपोली नगर परिषदेचा रणसंग्राम आता आपल्या लढाई क्षेत्रात प्रवेश करीत आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बलाढ्य शिवसेना - भाजप - आरपीआय महायुती व राष्ट्रवादी अजित पवार गट - शिवसेना उध्दव ठाकरे - शेतकरी कामगार पक्ष यांच्या परिवर्तन विकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. उद्या छाननी आणि मग माघारीपर्यंत 'वेट अँड वॉच' अशी काहींची भुमिका असेल पण आम्ही कसे खोपोलीकरांचे लाडके आहोत...आम्हाला कसा मतदारांचा पाठींबा आहे...आम्ही कसे जिंकणार, आमच्यासोबतच कसे पदाधिकारी, कायकर्ते व नागरीक आहेत, हा दाखविण्याचा प्रयत्न करीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. दरम्यान, आम आदमी पार्टीने कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता खोपोलीच्या विकासाचा ध्यास घेत नगराध्यक्ष पदासाठी तसेच 11 नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. “प्रामाणिकता, पारदर्शकता आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी लढणारे राजकारण” अशी हाक देत 'आप'ने या निवडणुकीत खऱ्या अर्थाने स्वच्छ, नवा, प्रामाणिक पर्याय उभा केला आहे.
* खोपोलीच्या विकासाचा नवा आराखडा :- आम आदमी पार्टीने निवडणूक लढवत खोपोलीसाठी प्राधान्यक्रम जाहीर केले आहेत. भ्रष्टाचारमुक्त खोपोली, मूलभूत सुविधा : पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता तसेच जागतिक दर्जाचे शिक्षण आणि आरोग्य, 100% कचरा व्यवस्थापन व्यवस्था, बेकायदेशीर टेंडर, टक्केवारी राजकारणाविरोधात मोहीम, पाताळगंगा जलस्रोतावर आधारित कायमस्वरूपी जलव्यवस्था, वाहतूक कोंडी, शिळफाटा–गाजी बाबा दर्गा रस्ता समाधान आदी विषयांवर जिंकून आल्यावर काम करू, असा नवा विकास आराखडा 'आप'ने जाहीर केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी व शिवसेना शहराच्या विकासाबाबत न बोलता एकमेकांचे नेते, कार्यकर्ते पळविण्यात व्यस्त आहेत.
* सत्ता 20 - 25 वर्ष एका गटाकडे…तरी खोपोली मागेच का ? :- सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट भाजपासह केंद्र व राज्यात सत्तेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अनेक वर्ष आमदार होता...आता शिवसेनेचा आमदार आहे, तरी खोपोलीतील अनेक मुलभूत प्रश्न 20-25 वर्षापासून सुटलेले नाहीत. 'आप'ने सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल करीत काही मुद्दे स्पष्टपणे मांडले. ते म्हणाले की, पावसाळ्यात तुफान पाऊस असताना देखील टाटा कंपनीने एक दिवस पाणी सोडणे बंद केले की पाणी टंचाई का ? कोट्यवधींचे टेंडर देऊनही शहर कचऱ्यात का बुडते ? नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वतःच्या घराचा रस्ताही करू शकले नाहीत, मग खोपोली काय बदलणार ? अल्पसंख्याक वस्त्यांना महामार्गांवरून आत येण्यासाठी रस्ताही नाही, 25 वर्षांच्या सत्तेत हेही शक्य नाही ? कब्रस्थान स्वच्छतेसाठीही नागरिकांना संघर्ष, हे विकासाचे मॉडेल ? स्मशानभूमी दुरुस्तीसाठी व स्वच्छतेसाठी वारंवार अर्जफाटे करावे लागतात? नगर परिषद शाळांची अवस्था अत्यंत हलाखीची आहे. नगरसेवक असतांना आपल्या प्रभागाचा विकास न साधू शकलेले, आता शहर विकासाच्या गप्पा मारत आहेत ? दोन्ही पक्षांना खोपोलीकरांनी अनेक वर्षे संधी दिलीपण विकास कोठेच दिसला नाही, असा घणाघात आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी केला आहे.
* डॉं. रियाज पठाण यांचे भाष्य : खोपोलीचा चेहरामोहरा बदलणार…बस एक संधी द्या :- नगराध्यक्ष पदाचे आम आदमी पार्टीचे उमेदवार डॉं. रियाज युसूफखान पठाण म्हणाले की, तीन वर्षांपासून खोपोलीच्या प्रत्येक समस्येवर फक्त आम्ही आवाज उठविला आणि कामे मार्गी लावली आहेत. ताकई रस्ता 'आप'च्या संघर्षाने झाला. इंदिरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गाजी बाबा दर्गाह चौक, गुलडक चौक यांना मोकळा श्वास 'आप'मुळे मिळाला. मुंबई - पुणे जुना महामार्ग रूंदीकरण, स्ट्रिट लाईटची आजची झगमगाट फक्त आणि फक्त 'आप'मुळे आहे. मिल्लतनगर, उमरजी पटेल नगर, शिळफाटा, लौजी, मुळगाव येथील समस्या 'आप'ने सोडविल्या... सत्ता नसतानाही 'आप'ने आंदोलन, मोर्चे, उपोषणाचा मार्ग अवलंबत विकास कामे करून घेतली...विरोधकांच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या प्रभागातील समस्या आम आदमी पार्टीने सोडविल्या आहेत आणि ज्या प्रभागाचा विकास करता आला नाही, ते शहराचा विकास करायला निघाले आहेत. तरी खोपोलीकरांनी डोळे उघडून, सद्सद्धविवेक बुध्दीचा वापर करून आपल्या व आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम आदमी पार्टीला साथ द्यावी. आज नागरिकांना स्वच्छ राजकारणाचा पर्याय हवा आहे आणि आम्ही तो दिला आहे, तरी आम्हाला एक संधी द्या, आम्ही खोपोलीचा चेहरामोहरा बदलून टाकू, असे आवाहन डॉं. पठाण यांनी केले आहे.
* ग्यासुद्दीन खान : खोपोलीला जागतिक दर्जाचे शहर बनवू :- प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार तथा आम आदमी पार्टीचे खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले की, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शेकाप या सर्व पक्षांना खोपोलीकरांनी संधी दिली आहे. आता खोपोलीला नव्या विचारांची गरज आहे. आम्ही खोपोलीला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा निर्धार आम्ही केला आहे, तरी आम आदमी पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉं. रियाज पठाण व इतर 11 उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन खान यांनी केले.
* आम आदमी पार्टीचे उमेदवार :- नगराध्यक्ष पद डॉं. रियाज युसूफखान पठाण, नगरसेवक पद ग्यासुद्दीन खान (प्रभाग 1 ब), वैशाली वाघमारे (प्रभाग 10 ब), डॉं. रियाज पठाण (प्रभाग 10 क), अभिषेक परदेशी (प्रभाग 14 अ), नसरीन नासिर खान (प्रभाग 9 ब), शकीला जहीर अहमद शेख (प्रभाग 8 ब), मुमताज अल्ताफ मन्सुरी (प्रभाग 13 अ), रोशनी कैलास परदेशी (प्रभाग 10 अ), धर्मेंद्र चौहान (प्रभाग 7 ब), अर्चना राहुल बोरे (प्रभाग 2), मदिना अशपाक पटेल (प्रभाग 6) अशी आहेत.
* खोपोलीतील राजकारणात ‘आप’चे आव्हान :- राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, आम आदमी पार्टीचने अर्ज दाखल केल्याने खोपोलीतील परंपरागत समीकरणांना मोठा धक्का बसू शकतो. विशेषतः अल्पसंख्याक बहुल प्रभागांमध्ये ‘आप’चे उमेदवार मजबूत आहेत.

Post a Comment
0 Comments